पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळ्या मंडळींना आम्ही कचऱ्याच्या कुंडीत लोटणार होतो, पण काही पर्याय नव्हता. असते एकेकाचे नशीब असे म्हणायचे.
 यांचे कचऱ्याचे नशीब टाळता येत नव्हते. निदान त्यांच्या नशिबी आलेला हा कचऱ्याचा फेरा आपल्याला कमी करता येईल का ? माझ्या हातात सुरी होती, समोर विळी होती. मी ही दोन्ही अस्त्रे परजली. या सर्व टाकाऊ वस्तू घेऊन त्याचे बारीकबारीक तुकडे केले आणि मग ते कचऱ्याच्या बादलीत जमा केले. असे केल्याने या सर्व टाकाऊ बनलेल्या वस्तूंना त्यांच्या सध्याच्या अवस्थेतून मातीत रूपांतर व्हायला लागणारा कालावधी कमी होणार होता.
 अशा तऱ्हेने सकाळी जेवणापर्यंत आमच्या घरातील कचऱ्याच्या तीन बादल्यांपैकी एका बादलीतच तळाशी थोडासा कचरा जमा झालेला दिसू लागला होता. हा कचरा अतिशय थोडासा दिसत होता याचे मुख्य कारण होते, या कचऱ्याला बादलीत टाकण्यापूर्वी आम्ही तो करता येईल तेवढा बारीक केला होता.
 त्या दिवशी संपूर्ण दिवस घरात काहीबाही येतच होते. घरात येणाऱ्या या अनेक वस्तूंबरोबर वेष्टणाच्या स्वरूपातही बऱ्याच वस्तू घरात येत होत्या. ह्या वस्तूंचे वेष्टण सोडून आतला पदार्थ बाहेर काढल्यावर या वेष्टण मंडळींच्या नशिबी कचराकुंडीच होती. मी दक्ष झालो. वेष्टणाचे सर्व कागद वेगळे केले, प्लॅस्टिकच्या पिशव्या वेगळ्या केल्या, त्या स्वच्छ केल्या आणि वाळवण्यासाठी टांगून ठेवल्या. इस्त्रीवाला भय्या कपडे घेऊन आला. कपड्यांच्या बंडलाचा दोरा सोडला, कागद बाजूला केला, कपडे घरात घेऊन गेलो. दोऱ्याचा गुंडाळा केला, कपड्यांना गुंडाळलेला कागद तसा मोठा होता, तो रद्दीत ठेवला.
 संध्याकाळी जंगी खरेदी झाली. खरेदीबरोबरच पुठ्याचे बरेच खोके आणि प्लॅस्टिकच्या बॅगा घरात आल्या. पुठ्याचे खोके रद्दीच्या खणात ठेवले. या सर्व गोष्टी पूर्वी मी कचऱ्याच्या बादलीत टाकल्या असत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीच्या कचरेवाल्याला दिल्या असत्या. त्याने हे सर्व खोके मोठ्या बादलीत कोंबले असते. माझ्या रद्दीच्या खणात सुंदर दिसणारे खोके उद्या सकाळी क्षणात कवडीमोल, विद्रूप झाले असते.

 रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलमधून जेवण मागवायची आयडिया सर्वांना एकदम पसंत पडली. हॉटेलमधून प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि डबे यांतून सर्व जेवण आले. सगळ्यांना कडाडून भुका लागल्या होत्या. त्यातून तो खमंग वास सगळ्यांची अस्वस्थता वाढवीत होता. आलेले जेवण प्रथम भांड्यात काढायला पाहिजे होते. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांची तोंडे मोकळी करायला पाहिजे होती. या पिशवीला मारलेली गाठ निघणारच नाही अशी समजूत आपण करून घेतलेली असते.


१८ * शून्य कचरा