पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड पंडित, गणपती विष्णू पंडित, गणपती विष्णू ज्येष्ठ न्यायविद आणि कायद्याचे प्राध्यापक ११ जून १९११ - १२ एप्रिल १९७८ गणपती विष्णू पंडित यांचा जन्म खानदेशात झाला. त्यांचे घराणे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील अडिवरे येथील. त्यांच्याकडे तेथील कुलकर्ण्यांचे वतन होते. त्यांचे वडील विष्णुपंत पंडित हे पोलीस अधिकारी होते. फैजपूर येथे त्यांची नेमणूक असताना तेथे झालेल्या दंग्यात त्यांनी मोठ्या धैर्याने गुंडांना पळवून लावले होते. मात्र त्यांच्या शौर्याचे कौतुक होण्याऐवजी त्यांच्यावरच ठपका ठेवण्यात आला. नंतर त्या संबंधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या अपिलात त्यांची निर्दोष मुक्तता झाली. विशेष म्हणजे त्या अपिलाचा मसुदा त्यावेळी इंग्रजी पाचवीत असलेल्या गणपती यानेच तयार केला होता. गणपती पंडित यांचे शालेय शिक्षण पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. १९२९साली गणपती मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे सर्व भावंडांना आपले पुढचे शिक्षण स्वत:च्या हिमतीवर करावे लागले. पेशवाईच्या काळात पंडित कुटुंबाला पुण्यात नारायण पेठेत नदीकाठाजवळ जमीन मिळालेली होती. त्या जागेवर पंडित कुटुंबियांचे घर प्रा.पंडित आणि त्यांचे थोरले बंधू शंकर पंडित यांनी उभे केले. पंडित यांनी इंग्रजी व संस्कृत हे विषय घेऊन बी.ए. व एम.ए. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी फर्गसन महाविद्यालयात इंग्रजीचे ‘ट्यूटर’ म्हणून काम केले. याच सुमारास कायद्याच्या अभ्यासक्रमात काही बदल होऊन तेथे पहिल्या वर्षासाठी इंग्रजी विषय आवश्यक झाला. पंडित यांनी पुण्याच्या ‘लॉ कॉलेज’चे (आजचे आय.एल.एस. विधि महाविद्यालय) संस्थापक व प्राचार्य ज.र.घारपुरे यांची भेट घेतली आणि त्यांना त्या महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. मात्र तेथे दाखल झाल्यावर प्राचार्य घारपुरे यांनी त्यांना कायद्याच्या अभ्यासासाठी त्याच वर्गात विद्यार्थी म्हणून बसण्यास सांगितले. त्यामुळे इंग्रजीचा तास घेऊन झाला की कायद्यातील विषयांच्या तासांसाठी ते समोर आपल्याच विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसत. यावेळी त्यांच्या बाकावर बसणारे त्यांचे सहाध्यायी य.वि.चंद्रचूड हे पुढे भारताचे सरन्यायाधीश आणि ‘इंडियन लॉ सोसायटी’चे अध्यक्ष झाले. पंडित यांचे नाव फर्गसन महाविद्यालयापासूनच इंग्रजीचे उत्तम शिक्षक म्हणून सर्वतोमुखी झाले होते. विधि महाविद्यालयामधून त्यांनी एलएल.बी. केले आणि नंतर १९४५मध्ये एलएल.एम ची परीक्षाही ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. तोपर्यंत मुंबई विद्यापीठात हा मान मिळविणारे ते केवळ दुसरे विद्यार्थी होते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इंग्रजीबरोबरच कायद्याचे शिक्षक म्हणूनही काम करणे क्रमप्राप्त होते. त्यांना स्वत:ला त्याबाबत थोडी शंका होती. परंतु लवकरच न्यायशास्त्र (ज्युरिस्प्रुडन्स) आणि हिंदू कायदा, रोमन शिल्पकार चरित्रकोश