पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पळणिटकर, श्रीपतराव न्यायपालिका खंड कायदा आणि खाजगी आंतरराष्ट्रीय कायदा या विषयांचे नामांकित प्राध्यापक म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. पुण्याच्या विधि महाविद्यालयाचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरही मोठे होण्यात प्रा.पंडितांच्या या कामगिरीचा मोठा वाटा होता. त्यामुळे महाविद्यालयामध्ये केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या सर्व भागांतून विद्यार्थी येऊ लागले. न्यायशास्त्र हा विषय पंडित इतक्या परिणामकारक रीतीने शिकवीत की, त्याचा प्रभाव पुढे आपल्या संपूर्ण कारकिर्दीवर राहिल्याचे त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. विधि महाविद्यालयाच्या वाढत्या ख्यातीमुळे तेथे एक कला महाविद्यालयही सुरू करावे असे प्रा.घारपुरे यांच्या मनात आले. विधि महाविद्यालयाची मूळ इमारत व वसतिगृह आधीच भव्य व निसर्गसुंदर परिसरात होते. मागील डोंगरावर मोठी जागा उपलब्ध होती. तेव्हा नव्या महाविद्यालयासाठी एक दिमाखदार वास्तू उभी करण्याचा संकल्प घारपुरे यांनी केला व त्यासाठी बरेच मोठे कर्ज काढले. ते १९५०मध्ये वयोमानापरत्वे निवृत्त झाले आणि प्राचार्यपदाचा मुकुट त्यांनी ग.वि.पंडितांच्या शिरावर ठेवला. मात्र हा मुकुट काटेरी असल्याचे लवकरच प्रा.पंडितांच्या लक्षात येऊ लागले. कारण नवीन महाविद्यालयाचा प्रयोग म्हणावा तसा यशस्वी झाला नाही आणि एक वर्षातच ते महाविद्यालय बंद करावे लागले. कर्जाचा मोठा डोंगर शिरावर घेऊन प्राचार्य पंडित यांना आपली पुढची वाटचाल करावयाची होती. विधि महाविद्यालयाला सरकारी अनुदान मिळत नसे. देणेकरी तर कायम दाराशी येऊन उभे राहत. त्यामुळे अशी वेळ येऊन ठेपली की, महाविद्यालयाची मालमत्ता गहाण ठेवून कर्जफेड करण्याचा प्रस्ताव आला. पण याच मालमत्तेचा मोठ्या चातुर्याने उपयोग करून, आयुर्विमा महामंडळ या संपन्न संस्थेची जागेची गरज भागवून पंडितांनी उत्पन्नाचा मार्ग शोधला. हळूहळू कर्ज फिटू लागले. मात्र त्यांची स्वत:ची प्राचार्यपदाची वर्षे यातच गेली आणि संस्थेकरिता काही नव्या योजना करणे त्यांना शक्यच झाले नाही. उत्तम विद्यार्थी तयार करणे ही मात्र त्यांची महनीय कामगिरी होती. महाविद्यालयात शेकड्यांनी विद्यार्थी असले तरी अक्षरश: प्रत्येकाकडे त्यांचे जातीने लक्ष असे आणि त्याची संपूर्ण माहिती घेऊन ते त्याला उत्तम मार्गदर्शन करीत असत. १९७१मध्ये प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्यानंतरही पंडित प्राध्यापक म्हणून काम करीत असत. त्याशिवाय ते इंडियन लॉ सोसायटीचे सचिवही होते. या सर्व जबाबदार्‍या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या होत्या. संस्थेला अडचणीच्या काळातून बाहेर काढून त्यांनी ती सुदृढ स्वरूपात प्रथम प्रा. रानडे व नंतर प्रा.डॉ.साठे यांच्या हवाली केली आणि त्या दोघांनाही उत्तम मार्गदर्शन केले. - सविता भावे

पळणिटकर, श्रीपतराव हैदराबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश १८९७ - ३१ जानेवारी १९५८ श्रीपतराव पळणिटकर यांचा जन्म नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील वझार या गावी झाला. नांदेड जिल्हा तेव्हा हैदराबाद संस्थानात होता. श्रीपतरावांचे शालेय शिक्षण हैदराबादला, महाविद्यालयीन शिक्षण पुण्याला आणि कायद्याचे शिक्षण मुंबईला झाले. बी.ए.(ऑनर्स) आणि एलएल.बी. या पदव्या संपादन केल्यानंतर ते हैदराबादला वकिली करू लागले. सुरुवातीला त्यांनी तेव्हाचे हैदराबादचे प्रसिद्ध वकील काशिनाथराव वैद्य यांच्या हाताखाली काम केले. तेव्हा ते सिकंदराबादच्या कॅन्टॉन्मेंट न्यायालयासह सर्व न्यायालयांत काम करीत असत. थोड्याच शिल्पकार चरित्रकोश प | १३