पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नियोगी, भवानीशंकर न्यायपालिका खंड १९१५ मध्ये भवानीशंकर नागपूर नगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले. पुढे १९२५ ते १९२८ या काळात ते नागपूरचे नगराध्यक्ष होते. डिसेंबर १९२० मध्ये नागपूरला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी त्यांनी डॉ. मुंजे यांच्या हाताखाली सहसचिव म्हणून काम केले. महात्मा गांधींच्या असहकारितेच्या आंदोलनाच्या वेळी भवानीशंकरांनी काही काळ वकिली सोडून दिली होती, पण १९२२ मध्ये पुन्हा सुरू केली आणि यशस्वी वकील म्हणून त्यांचा लौकिक झाला. आमगाव जमीनदारी खटला प्रिव्ही काउन्सिलपर्यंत गेला; तो लढविण्यासाठी १९२७ मध्ये ते इंंग्लंडला गेले. त्याच वेळी त्यांनी युरोपचा प्रवास करून अनेक गोष्टींचा अभ्यास केला. नंतर १९३४ मध्ये त्यांनी चीन, जपान आणि पूर्वेकडील इतर देशांचा प्रवास केला. जून १९३० मध्ये नागपूरचे अतिरिक्त न्याय आयुक्त म्हणून नियोगींची नियुक्ती झाली. १९३६ मध्ये नागपूर उच्च न्यायालय स्थापन झाल्यावर नियोगी यांची नियुक्ती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. नागपूर उच्च न्यायालयाच्या पहिल्या पाच न्यायाधीशांपैकी ते एक. यांपैकी दोन भारतीय होते-एक नियोगी आणि दुसरे विवियन बोस. १९४६ मध्ये नियोगी न्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. एक अतिशय विद्वान आणि उदार न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक होता. याच सुमारास त्यांना ‘सर’ ही पदवी मिळाली. १९२५ ते १९२८ या काळात नागपूरचे नगराध्यक्ष असताना त्यांनी नागपूर शहरात अनेक विधायक गोष्टींना चालना दिली. शुक्रवार तलावाजवळील टिळक पुतळा त्यांच्याच कारकिर्दीत उभारला गेला. नगरपालिकेतील कार्याव्यतिरिक्त सर भवानीशंकर यांनी शिक्षणक्षेत्रात भरीव आणि उल्लेखनीय कार्य केले. नागपूर विद्यापीठाचे ते दोन वेळा कुलगुरू होते. नागपूरमधील अनेक शिक्षणसंस्थांशी त्यांचा घनिष्ठ संंबंध होता. नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. विविध शिक्षणसंस्थांसाठी तसेच अन्य सामाजिक अन्य सामाजिक संस्थांसाठी ते सढळ हाताने पदरमोड करीत मात्र त्यांची स्वत:ची राहणी अत्यंत साधी होती. सर भवानीशंकर पुरोगामी विचारांचे, कर्ते सुधारक होते. विशेषत: अस्पृश्यता निवारण आणि विधवा पुनर्विवाह यांचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी स्वत: (त्याचप्रमाणे आधीच्या पिढीत त्यांच्या काकांनी आणि सासर्‍यांनी) विधवेशी विवाह केला होता. निवृत्तीनंतर काही काळ सर भवानीशंकर जुन्या मध्य प्रदेश राज्याच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यानंतर १९५४ मध्ये जुन्या मध्य प्रदेश सरकारने राज्यातील ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या कामकाजाची, विशेषत: ते घडवीत असलेल्या धर्मांतराची चौकशी करण्यासाठी न्या.नियोगींच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. या प्रश्नाचा सांगोपांग अभ्यास करून आयोगाने विस्तृत अहवाल सादर केला आणि विविध शिफारशी केल्या. १९५६मध्ये डॉ.आंबेडकरांबरोबर न्या.नियोगी यांनीही बौद्ध धर्माचा स्वीकार केला. - सु. ह. जोशी/दिलीप सेनाड

शिल्पकार चरित्रकोश