पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १८६२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थापनेमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील कायदा - न्यायव्यस्थेला एक केंद्रबिंदू प्राप्त झाला. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा आणि तालुका पातळीवर कनिष्ठ न्यायालये स्थापन झाली, इंग्लंडमधून इंग्रज बॅरिस्टर उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी मुंबईला येऊ लागले आणि भारतीयही इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होऊन परत येऊन उच्च न्यायालयात वकिली करू लागले; याशिवाय मुंबईतच 'लॉ कॉलेज' स्थापन झाल्याने, इंग्लंडला न जाता मुंबईतच कायद्याचे शिक्षण घेऊनही पुष्कळ लोक यशस्वी वकील होऊ लागले. हळूहळू भारतीयांनाही उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक मिळू लागली.
 तिकडे नागपूर येथे अगोदर न्याय आयुक्त न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालय स्थापन झाल्याने मध्य प्रांत-वऱ्हाडात, तर हैदराबाद संस्थानातही उच्च न्यायालय असल्याने हैदराबादमध्येही, कमी-अधिक प्रमाणात असेच चित्र होते. त्या दोन उच्च न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रांतील अनुक्रमे विदर्भ - वऱ्हाड आणि मराठवाडा हे भाग आज महाराष्ट्रात समाविष्ट आहेत.
 अशा प्रकारे आजच्या महाराष्ट्रात गेल्या १५०-२०० वर्षांत होऊन गेलेल्या न्यायाधीश आणि वकीलमंडळींपैकी कोणाकोणाचा समावेश प्रस्तुत कोशात करावयाचा, याचा विचार जेव्हा सुरू झाला, तेव्हा हाताशी असलेला वेळ, खंडामध्ये उपलब्ध असलेली जागा, उपलब्ध माहिती आणि नोंदी लिहू शकणारे लेखक, या चारही गोष्टींच्या अभावामुळे फारच मर्यादा पडल्या. परिणामी, अत्यंत निवडक नावांचाच समावेश करता आला. वर उल्लेख केल्याप्रमाणे कायद्याच्या राज्याचा पाया अनुक्रमे महाराष्ट्र- पश्चिम भारतात आणि संपूर्ण भारतात घालणारे एल्फिन्स्टन आणि मेकॉले यांचे अपवाद सोडल्यास अन्य कोणाही ब्रिटिश व्यक्तीचा समावेश यात करण्यात आलेला नाही. आजचा महाराष्ट्र ही ज्यांची जन्मभूमी आणि / किंवा निदान कर्मभूमी आहे, अशा निवडक महनीय व्यक्तींचा समावेश यात केला आहे.
 न्यायाधीश आणि वकील यांच्या व्यतिरिक्त, कायद्याचे प्राध्यापक आणि घटना - कायदा - न्यायविषयक 'अॅकॅडमिक' स्वरूपाचे मूलभूत लेखन करणारे न्यायविद किंवा 'ज्युरिस्ट' यांची कायदा आणि न्यायाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका असते. अर्थात काही न्यायविद हे वकील किंवा न्यायाधीश असू किंवा होऊ शकतात, पण प्रत्येक वकील किंवा न्यायाधीश न्यायविद असेलच असे नाही.
 अत्यंत अपुऱ्या वेळात आणि इतर अनेक अपरिहार्य मर्यादांमधून वाट काढीत हा प्रस्तुत खंडाचा कायदा- न्यायपालिका विभाग सिद्ध झाला आहे. यामध्ये समाविष्ट झालेल्या नावांची यादी परिपूर्ण नाही, याची आम्हा सर्वांना जाणीव आहे. अन्य त्रुटीही असतील. त्यांच्याबद्दल मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि वाचक उदार मनाने क्षमा करतील, अशी आशा व्यक्त करतो.
 नोंदी लिहून देणाऱ्या लेखकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. 'विवेक' चे प्रबंध संपादक श्री. दिलीप करंबेळकर, प्रस्तुत प्रकल्पाचे कार्यकारी संपादक श्री. दीपक जेवणे आणि प्रकल्प समन्वयक श्री. महेश पोहनेरकर यांचे, हे काम माझ्याकडे सोपविल्याबद्दल आणि नंतर सर्व प्रकारचे सहकार्य केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. 'विवेक' च्या पुणे कार्यालयातील कु. संध्या लिमये यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे त्याचप्रमाणे श्री. राजेश प्रभू यांचे आणि मुद्रितशोधक सौ. वृषाली सरदेशपांडे यांचेही मन:पूर्वक आभार मानतो.
 माझे ज्येष्ठ स्नेही निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी वडिलकीच्या नात्याने सतत केलेल्या बहुमोल मार्गदर्शनामुळेच हे अवघड काम माझ्या हातून होऊ शकले. त्यांनी स्वतः काही महत्त्वाच्या नोंदीही लिहिल्या. न्या. चपळगावकर यांचा मी मन:पूर्वक ऋणी आहे.

-शरच्चंद्र पानसे

८ / न्यायपालिका खंड

शिल्पकार चरित्रकोश