पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कोशरचना


 कोणत्याही कोशाचे वाचन कथा अथवा कादंबरीप्रमाणे सलग असे सामान्यपणे केले जात नाही. वाचकास हवा असलेला संदर्भ सुलभपणे आणि शीघ्रतेने उपलब्ध करून देणे, हे कोशाचे प्रमुख प्रयोजन समजले पाहिजे. वाचकांना या कोशाचा उपयोग करणे सोपे आणि सुलभ व्हावे या हेतूने या चरित्रकोशाच्या रचनेबाबत आणि स्वरूपाबाबत माहिती देत आहोत.
 कोशाचे स्वरूप
 कोशाचे दोन मुख्य प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे विशिष्ट विषयाचा व दुसरा प्रकार म्हणजे सर्वविषयसंग्राहक. 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश' हा पहिल्या प्रकारचा प्रकल्प म्हणजे विशिष्ट विषयाचा कोश आहे. या प्रकारच्या कोशरचनेचे काही स्वाभाविक फायदे आहेत. भारंभार माहितीतून आपणास हवी असलेली माहिती शोधून काढणे वाचकाला सुलभ आणि सोपे होणे हा सर्वांत मोठा फायदा आहे. प्रस्तुत कोश हा या प्रकल्पातील साहित्य खंड आहे. या प्रकल्पाचा आणखी एक विशेष म्हणजे हा व्यक्तिचरित्रकोश आहे. त्यामुळे यात व्यक्तींच्या चरित्रनोंदी दिल्या आहेत.
 संपादकीय भूमिका
 या खंडाच्या संपादक-मंडळाने त्या खंडाची एकंदर पृष्ठसंख्या लक्षात घेऊन चरित्रनायकांच्या नोंदींची विभागणी चरित्रनोंद, टिपण नोंद आणि नामोल्लेख नोंद अशी केलेली आहे. वास्तविक पाहता कोणत्याही चरित्रनायकाच्या एकंदर कार्याचा आवाका हा त्याच्या चरित्रकाराशिवाय अथवा चरित्रअभ्यासकाशिवाय अन्य थोरामोठ्या अभ्यासकांनाही सर्व बारकाव्यांनिशी पूर्णपणे लक्षात घेऊन त्याच्या नोंदींची शब्दसंख्या ठरवून अशी विभागणी करणे, हे जिकिरीचे कार्य होते. कारण अशा विषयाधारित चरित्रकोशात एखाद्या चरित्रनायकाचे सर्वक्षेत्रीय योगदानाचा व कार्यकर्तृत्वाचा सांगोपांग तपशीलवार उल्लेख करण्याचे सूत्र स्वीकारले, तर त्या कार्याला काही अंतच राहत नाही. तसेच प्रत्येक चरित्रनायकाचे सर्वक्षेत्रीय योगदान कथन करणे, हे विषयाधारित कोशाचे उपयोजन नाही व नसते, हे लक्षात घेतले पाहिजे. विषयाधारित कोश त्या व्यक्तीच्या अन्यक्षेत्रीय पैलूंबाबत काही ठरावीक मर्यादिपर्यंतच मार्गदर्शन करू शकतो. चरित्रनायकाचे विशिष्ट क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचे नेमके चित्रण करण्याचा एक प्रयत्न, म्हणजे विषयाधारित कोश असतो. तरी संपादक मंडळाने आपले सर्व कौशल्य वापरून या सूचीला अंतिम रूप दिलेले आहे.
 विषयाधारित वर्गीकरण
 चरित्रनायकांचे विषयाधारित वर्गीकरण करताना जाणवणारी अडचण अशी की, एका चरित्रनायकाचे योगदान त्या विशिष्ट कार्यक्षेत्रापुरतेच मर्यादित नसून अन्यही क्षेत्रांत त्याने लक्षणीय अथवा भरीव कामगिरी केलेली आहे असे दिसले. अशा परिस्थितीत एकाच चरित्रनायकाच्या नोंदीची पुनरावृत्ती वेगवेगळ्या खंडांत होऊ नये म्हणून अशा सरमिसळ होऊ शकणाऱ्या चरित्रनोंदींसाठी काही मर्यादा व निकष ठरविण्यात आले. त्यानुसार भिन्न खंडांच्या संपादक मंडळांना तशा सूचना देण्यात आल्या. मात्र अन्य खंडांत या चरित्रनायकांची त्या क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करणारी टिपणनोंद घेतली जाईल, याचीही दक्षता घेण्यात आली व अशा

शिल्पकार चरित्रकोश

न्यायपालिका खंड / ९