पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड नियोगी, भवानीशंकर


सुनावणी पाच न्यायाधीशांच्या विशेष पूर्णपीठापुढे झाली. नानावटीची जन्मठेप पुढे सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. न्या.बावडेकर यांच्या राजीनाम्यामुळे अर्धवट राहिलेली पानशेत चौकशी पूर्ण करण्यासाठी न्या.नाईक यांची नियुक्ती ते न्यायाधीश असतानाच झाली. चौकशीचा प्रदीर्घ अहवाल त्यांनी सादर केला. १९६७मध्ये न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यावर न्या.नाईक यांनी तीन वर्षे औद्योगिक न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. पुढे ते पुण्याला स्थायिक झाले. तेथे ते शेवटपर्यंत अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांशी संबद्ध होते. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आणि कर्वे समाजशास्त्र संस्थेचे ते अनेक वर्षें अध्यक्ष होते. १९७४ पासून १९७७ पर्यंत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू होते. बेळगावला विधि महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावादावर केंद्र सरकारने नेमलेल्या न्या.महाजन आयोगासमोर न्या.नाईक यांनी महाराष्ट्रातर्फे साक्ष दिली. न्या. नाईक व्यक्तिस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते होते. ‘स्वातंत्र्य : प्रेरणा आणि साधना’ आणि ‘मॅन अ‍ॅण्ड दि युनिव्हर्स’ ही महत्त्वाची पुस्तके त्यांनी लिहिली. आणीबाणीच्या काळात ‘सिटिझन्स फोरम फॉर डेमोक्रसी’ ही संघटना स्थापन करून लोकमत संघटित करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. - शरच्चंद्र पानसे


नियोगी, भवानीशंकर नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ३० ऑगस्ट १८८६ - १८ जुलै १९८७ शतायुषी होण्याचे विरळा भाग्य लाभलेल्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सुुपुत्रांपैकी एक, नागपूरचे पुराणपुरुष न्यायमूर्ती सर भवानीशंकर नियोगी यांचा जन्म नागपूरला झाला. त्यांचे घराणे मूळचे आंध्रातील मच्छलीपट्टणमचे आणि तेलुगूभाषी. परंतु भवानीशंकरांचे पणजोबा बैरागीबाबू नागपूरला येऊन स्थायिक झाले आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या पूर्णपणे मराठी बनल्या. बैरागीबाबूंच्या एका मुलाचे नाव भवानीशंकर होते; सर भवानीशंकर यांचे ते आजोबा. आजोबांचे नाव नातवाला ठेवण्याच्या प्रथेनुसार त्यांना त्यांच्या आजोबांचे नाव मिळाले. सर भवानीशंकर यांचे बालपण नागपूर येथेच गेले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि १९०६ मध्ये कोलकाता विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी काही काळ सीताबर्डीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये शिक्षकाचे काम केले. त्याचवेळी त्यांचा एम.ए. आणि एलएल.बी.चा अभ्यासही चालू होता. डिसेंबर १९०९ मध्ये एलएल.बी., एप्रिल १९१० मध्ये एम.ए. आणि डिसेंबर १९१३ मध्ये एलएल.एम. अशा पदव्या त्यांनी मिळवल्या. शाळकरी वयापासूनच त्यांना वाचनाचा अतिशय नाद असल्याने कायद्याबरोबरच संस्कृत, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र अशा विविध विषयांचाही त्यांचा गाढा व्यासंग होता. सुरुवातीस पत्रकार होण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते मुंबईला गेले आणि अच्युत बळवंत कोल्हटकरांच्या ‘संदेश’ पत्राची इंग्रजी आवृत्ती ‘द मेसेज’चे त्यांनी काही काळ संपादन केले. याच काळात त्यांची लोकमान्य टिळकांशी भेट झाली. तेव्हा लोकमान्यांनी भवानीशंकरांना वकिली न सोडण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १९१६ पासून त्यांनी नागपूरला वकिली सुरू केली. लवकरच त्यांना ‘फर्स्ट ग्रेड प्लीडर’ म्हणून मान्यता मिळाली. याच वेळेस त्यांच्या सार्वजनिक जीवनासही सुरुवात झाली.


शिल्पकार चरित्रकोश ८७