पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देसाई, व्ही. एस. न्यायपालिका खंड न्यायालयाच्या ज्या पाच न्यायाधीशांच्या विशेष पूर्णपीठासमोर आला, त्याचे न्या.देसाई एक सदस्य होते. या पीठाचा एकमताचा निकाल हा मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा निकाल मानला जातो. आपल्या न्यायालयीन कामाव्यतिरिक्त न्या.देसाई एक श्रेष्ठ न्यायविदही होते. हिंदू कायद्यावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. सर दिनशा मुल्ला यांच्या ‘हिंदू लॉ’ या प्रख्यात ग्रंथाच्या बाराव्या व नंतरच्या अनेक आवृत्त्यांचे न्या.देसाईंनी अत्यंत साक्षेपाने संपादन केले. या प्रत्येक आवृत्तीला त्यांची प्रदीर्घ विवेचक प्रस्तावना आहे. शिवाय भागीदारीच्या (पार्टनरशीप) कायद्यावरही त्यांनी एक प्रमाणभूत ग्रंथ लिहिला. - शरच्चंद्र पानसे

देसाई, व्ही. एस. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ७ सप्टेंबर १९०७ - एप्रिल १९८९ व्ही.एस.देसाई यांचा जन्म सावंतवाडी संस्थानात झाला. त्यांचे शालेय शिक्षण वेंगुर्ला येथे आणि उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामध्ये झाले. बी.एस्सी. ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी शासकीय विधि महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु एलएल.बी.च्या पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी मुंबईच्या एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली. गणित हा त्यांच्या आवडीचा विषय होता. नंतर नोकरी करीत असतानाच त्यांनी एलएल.बी.चे दुसरे वर्ष पूर्ण करुन १९३८मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिलीस सुरुवात केली. पुढे भारताचे मुख्य न्यायाधीश झालेले न्या. प्र. बा. गजेंद्रगडकर त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेतील ज्येष्ठ आणि प्रथितयश वकील होते. त्यांचे सहायक म्हणून काम करण्याची संधी देसाई यांना मिळाली; त्यामुळे वकील म्हणून त्यांची उत्तम जडणघडण झाली. १९४४पासून देसाई यांनी स्वतंत्रपणे वकिली सुरू केली. लवकरच एक समतोल विचारांचे आणि शांतपणे युक्तिवाद करणारे वकील म्हणून त्यांचा लौकिक झाला. काही काळ त्यांनी मुंबईच्या शासकीय विधि महाविद्यालयामध्ये अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम केले. आपल्या वकिलीच्या कारकिर्दीत त्यांनी विविध प्रकारचे खटले यशस्वीरीत्या लढविले. १९५२मध्ये सहायक सरकारी वकील म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि नंतर १९५७मध्ये ते सरकारी वकील झाले. ९ जून १९५८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ८ ऑगस्ट १९६९ रोजी ते पदावरून निवृत्त झाले. एक मृदुभाषी, विद्वान आणि लोकप्रिय न्यायाधीश म्हणून न्या. देसाई यांची ख्याती होती. त्यांनी मुख्यत: अपील शाखेतील विविध प्रकारचे खटले चालविले. त्यात हिंदू कायदा, जमीनविषयक कायदा, आयकर कायदा यांमधील विविध खटले होते. त्यांच्यासमोर आलेला महत्त्वाचा फौजदारी खटला म्हणजे त्या काळात गाजलेला पुण्याचे डॉ. अनंत चिंतामण लागू यांच्याविरुद्धचा खुनाचा खटला होय. लक्ष्मीबाई कर्वे यांच्या खुनाबद्दल डॉ. लागू यांना पुण्याच्या जिल्हा न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध त्यांनी केलेले अपील न्या. जे. सी. शाह आणि न्या. देसाई यांच्या खंडपीठाने फेटाळून लावले आणि फाशीची शिक्षा कायम केली. तिच्यावर नंतर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. निवृत्त झाल्यानंतर न्या. देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वकिली सुरू केली आणि सर्वोच्च न्यायालयातही पूर्वीसारखाच लौकिक मिळवला. १९८८ मध्ये, वयाच्या ८१ व्या वर्षी ते वकिलीच्या व्यवसायातून पूर्णत: निवृत्त झाले. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. बॉम्बे लॉ रिपोर्टर, १९८९.

शिल्पकार चरित्रकोश ८२