पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड धर्माधिकारी, चंद्रशेखर शंकर ध । थे । धर्माधिकारी, चंद्रशेखर शंकर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश २० नोव्हेंबर १९२७ चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्म रायपूर येथे वकिलीची परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी हे न्या. धर्माधिकारी यांचे वडील होत. न्या.धर्माधिकारी यांचे शालेय शिक्षण वर्धा येथील नवभारत विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपूरचे एस.बी.सिटी कॉलेज आणि नोशेर महाविद्यालय येथे झाले. १९४९मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. नंतर नागपूर विद्यापीठातून १९५२मध्ये एम.ए. आणि विद्यापीठ कायदा महाविद्यालयातून १९५४मध्ये एलएल.बी. या पदव्या त्यांनी संपादन केल्या. दोन वर्षे जिल्हा न्यायालयात वकिली केल्यानंतर दि.२५ ऑक्टोबर १९५६ रोजी ते तेव्हाच्या नागपूर उच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. दि.२१ जुलै १९५८ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात आणि दि.२० जुलै १९५९ रोजी सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. ऑगस्ट १९६५मध्ये धर्माधिकारी यांची नागपूर येथे सहायक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. नंतर ऑक्टोबर १९७०मध्ये त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाचे अतिरिक्त सरकारी वकील म्हणून झाली. १३जुलै१९७२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २४नोव्हेंबर१९७२ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. १९नोव्हेंबर१९८९ रोजी ते पदावरून निवृत्त झाले. उच्च न्यायालयातील आपल्या कारकिर्दीत न्या.धर्माधिकारी यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. यामध्ये आणीबाणी लागू असतानाच्या काळातील नागरिकांचा जगण्याचा हक्क, स्त्रियांचे हक्क, मनोरुग्णांचे, कैद्यांचे व आदिवासी मुलांचे हक्क इ. विविध प्रश्नांवरील किंवा मुद्द्यांवरील निकालांचा उल्लेख करता येईल. त्यांच्यासमोर त्या वेळी अतिशय गाजलेले आणि महत्त्वाचे दोन फौजदारी खटलेही आले. त्यातील पहिला खटला म्हणजे पुण्याचे जोशी-अभ्यंकर हत्याकांड. या हत्याकांडातील आरोपींना पुण्याच्या सत्र न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध त्यांनी केलेले अपील न्या.धर्माधिकारी आणि न्या.विजय कोतवाल यांच्या खंडपीठासमोर चालले. न्यायमूर्तींनी फाशीची शिक्षा कायम केली आणि नंतर ती सर्वोच्च न्यायालयानेही कायम केली. या आरोपींनी राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्जही फेटाळला गेला. दुसरा खटला म्हणजे चंद्रकला लोटलीकर खून खटला. यात रत्नागिरीच्या सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सरकारने केलेले अपील न्या. धर्माधिकारी आणि न्या. अगरवाल यांनी मंजूर केले आणि आरोपींना शिक्षा दिली. न्या.धर्माधिकारी यांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले.

शिल्पकार चरित्रकोश