पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वरं जनहितं ध्येयम् ।


पुणे महानगरपालिका

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तसेच भारतातील आठव्या क्रमांकावर असले पुणे शहराच्या अस्तित्वाच्या खुणा मध्ययुगीन काळापासून सापडतात. पुन्नक किंवा पुनवडी किंवा पुण्यनगरी म्हणून प्रसिद्ध असलेले पुणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. मुळा, मुठा व पवना अशा तीन नद्यांनी वेढलेले हे। शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून सुप्रसिद्ध आहे. तसेच अनेक शिक्षण संस्थांच्या जाळ्यामुळे पूर्वेकडील ऑक्सफर्ड' म्हणूनही मान्यता पावले आहे.
 १५ फेब्रुवारी १९५० पुणे शहराच्या व्यवस्थापनासाठी पुणे महानगरपालिकेची स्थापना झाली. नागरी सेवा व आवश्यक त्या सुविधा पुरवठा हे या संस्थेचे मुख्य काम आहे. शासनातर्फे मुख्य अधिकारी म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील (I.A.S.) अधिकारी महापालिका आयुक्त म्हणून नियुक्त केले जातात. पुणे महानगरपालिकेत सध्या एकूण १४९ नगरसेवक आहेत यातील १४४ थेट निवडणूक प्रक्रियेतून निवडून येतात. महानगरपालिकेतील १४४ वॉर्डातून विविध राजकीय व अपक्ष यांचे हे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात. महानगरपालिकेत विविध विभागांचे प्रत्यक्ष कामकाज मा. महाआयुक्त यांच्यामार्फत होते.
 महानगरपालिकेमध्ये महापौर, उप महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, महापालिकेतील गट नेता, सभागृह नेता व विरोधी पक्ष नेता आणि आयुक्त अशी सर्वसाधारण महत्त्वाची पदे आहेत. पुणे महानगराचे क्षेत्रफळ साधारणत: २४४ चौ.कि.मी. आहे व परिघावरील काही गावांचा नव्याने समावेश या पालिकेत करण्यात आला आहे. पुणे शहराची लोकसंख्या सुमारे ३५ लाख आहे. पुणे शहराच्या हद्दीत महापालिकेच्या एकूण २७५ प्राथमिक शाळा, २३९ पूर्वप्राथमिक शाळा असून यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या ८४,१९१ आहे. महापालिकेची एकूण २ रुग्णालये आहेत. महापालिका क्षेत्रात झोपडपट्टींची संख्या ५६४ असून त्यातील ३५३ घोषित आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात दर दिवसाला ६५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तसेच ३८९ दशलक्ष लीटर पाणी जलनि:सारणासाठी पुरवले जाते. महापालिका क्षेत्रात एकूण ८३ उद्याने असून २७ मंडई आहेत. ह्या महापालिकेच्या सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे काम १८,००० कर्मचारी करतात. महापालिकेने नदी सुधारणा प्रकल्प हाती घेतला असून जे.एन.एन.यू.आर.एम. च्या योजना महापालिका क्षेत्रात राबविल्या जात आहेत.
 नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी पुणे महानगरपालिकेने इ-गव्हर्नन्सची योजना सुरू केली आहे. त्यामुळे ऑनलाईन कर भरणा, तक्रार नोंदविणे, (RTI) माहिती अधिकार हे सर्व सुलभ झाले आहेत.
 पुणे महानगरपालिकेचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. झपाट्याने वाढणारे माहिती तंत्रज्ञान व इतर उद्योगांमुळे महापालिकेचे अंदाजप्रत्रक ही वाढत आहे. यंदाचे २०११-१२ चे वार्षिक अंदाजपत्रक सुमारे ३२००० कोटी रुपयांचे आहे.
 वर्तमान महापौर मा. मोहनसिंग राजपाल व मा. आयुक्त महेश झगडे यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात रस्ता, पाणीपुरवठा, वाहतूक यांच्या विकासाच्या योजना कार्यान्वित होणार आहेत.

अधिक माहितीसाठी : WWW.punecorporation.org


६ / न्यायपालिका खंड

शिल्पकार चरित्रकोश