पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड छागला, मोहम्मदअली करीमभाई छागला, मोहम्मदअली करीमभाई मुंबईउच्चन्यायालयाचेसरन्यायाधीश, ज्येष्ठन्यायविद ३० सप्टेंबर १९०० - ९ फेब्रुवारी १९८१ मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती मोहम्मदअली करीमभाई छागला यांचा जन्म मुंबईमध्ये एका प्रसिद्ध व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या अँटोनिओ डिसिल्व्हा हायस्कूल आणि सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये झाले. १९१७ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले; परीक्षेत ते लॅटिन विषयात पहिले आले. नंतर १९१९ मध्ये सेंट झेवियर्स महाविद्यालयातून इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते इंग्लंडला गेले आणि त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लिंकन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथून १९२२ मध्ये त्यांनी इतिहास विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि त्याच वर्षी ते इनर टेम्पलमधून बॅरिस्टर झाले. ऑक्सफर्डमध्ये असताना १९२१ मध्ये ते ‘ऑक्सफर्ड एशियाटिक सोसायटी’चे आणि १९२२ मध्ये ‘ऑक्सफर्ड इंडियन मजलिस’चे अध्यक्ष होते. स्वदेशी परत आल्यावर छागला यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत (ओरिजिनल साइड) महम्मदअली जिना यांच्या हाताखाली वकिली सुरू केली. सुरुवातीच्या काळात त्यांना काम मिळविण्यासाठी झगडावे लागले. १९२७ ते १९३० या काळात ते मुंबईच्या शासकीय विधि महाविद्यालयामध्ये घटनात्मक कायदा (कॉन्स्टिट्यूशनल लॉ) या विषयाचे प्राध्यापक होते. पुढे भारताचे सरन्यायाधीश झालेले न्या. जे.सी.शाह यावेळी छागला यांचे विद्यार्थी होते, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांचे सहकारी होते. १९३०पर्यंत छागला यांचा वकिलीत जम बसला. १९३३ ते १९४१ या काळात ते त्यावेळच्या बॉम्बे बार काउन्सिलचे सचिव होते. १९३७मध्ये मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नंतर १९४१ मध्ये ते मुंबई विद्यापीठाच्या सिंडिकेटवर निवडून आले. १९४१मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून छागला यांची नियुक्ती झाली. थोड्याच काळात एक विद्वान आणि निष्पक्ष न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक झाला. १९४६मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या अधिवेशनासाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. एप्रिल १९४७ ते नोव्हेंबर १९४७ पर्यंत ते मुंबई विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू होते. त्याच वर्षी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. १५ऑगस्ट१९४७ रोजी देश स्वतंत्र झाला; त्याचवेळी न्या.छागला यांची मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. १३फेब्रुवारी१९४८ रोजी त्यांची नियुक्ती कायम सरन्यायाधीश म्हणून झाली. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश होण्याचा मान त्यांना मिळाला.

शिल्पकार चरित्रकोश