पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

च | चैनानी, हशमतराय खूबचंद न्यायपालिका खंड |विविध प्रश्नांवर व कायद्यांच्या मुद्द्यांवर त्यांनी अनेक महत्त्वाचे निकाल दिले. त्यांची निकालपत्रे अतिशय तर्कशुद्ध, मुद्देसूद आणि वाचनीय असत. १९५९ चा नानावटी खटला मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशात गाजला. या प्रकरणातील मूळ फौजदारी खटल्याच्या निकालानंतर लगेचच एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा घटनात्मक प्रश्न उच्च न्यायालयासमोर आला. न्यायालयाने दिलेली शिक्षा स्थगित ठेवण्याचा राज्यपालांचा अधिकार हा त्यातील वादाचा मुद्दा होता. त्याची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या एका विशेष पूर्णपीठासमोर झाली. न्या.चैनानी हे या पीठाचे अध्यक्ष होते. त्यांनी दिलेला या पीठाच्या एकमताचा निकाल हा मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा निकाल मानला जातो. सत्र न्यायालयात ज्यूरीसमोर चाललेला हा भारतातील शेवटचा खटला. त्यानंतर ज्यूरी पद्धत रद्द करण्यात आली. न्या.चैनानी यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे हंगामी राज्यपाल म्हणूनही काम पाहिले. पहिल्या वेळी, राज्यपाल डॉ.सुब्बरायन यांचे निधन झाल्यामुळे ६ऑक्टोबर१९६२ ते ५डिसेंबर१९६२ पर्यंत, तर दुसर्‍या वेळी राज्यपाल श्रीमती विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्रसंघात भारतीय शिष्टमंडळाच्या नेत्या म्हणून गेल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत ५सप्टेंबर१९६३ ते १८डिसेंबर१९६३ पर्यंत. आपल्या न्यायालयीन कामाव्यतिरिक्त न्या.चैनानी शिक्षणक्षेत्रात आणि मुंबईमधील शिक्षणसंस्थांच्या कामात रस घेत असत. २८फेब्रुवारी१९६६ रोजी वयाची बासष्ठ वर्षे पूर्ण झाल्यावर न्या.चैनानी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले असते, परंतु १४नोव्हेंबर१९६५ रोजी मरीन ड्राइव्हवरील त्यांच्या घरापासून जवळच एका कारने धडक दिल्यामुळे ते गंभीररीत्या जखमी झाले. दोन आठवडे रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचे निधन झाले. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. बॉम्बे लॉ रिपोर्टर, १९५८, १९६५.

शिल्पकार चरित्रकोश