पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड चैनानी, हशमतराय खूबचंद चैनानी, हशमतराय खूबचंद मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश २९ फेब्रुवारी १९०४ - २८ नोव्हेंबर १९६५ हशमतराय खूबचंद चैनानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंधमधील हैदराबाद येथे झाला. तेथीलच हैदराबाद हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. १९२०मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर तीन वर्षे कराची येथील डी.जे.सिंध महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या मॅग्डलिन कॉलेजात प्रवेश घेतला. तेथून १९२५मध्ये त्यांनी ‘नॅचरल सायन्स ट्रायपॉस’ घेऊन केंब्रिज विद्यापीठाची बी.ए.पदवी संपादन केली. पुढच्याच वर्षी १९२६मध्ये ते आयसीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. त्या वर्षीच्या भारतीय उमेदवारांत त्यांचा पहिला क्रमांक आला. १९२७मध्ये आयसीएस अधिकारी म्हणून चैनानी यांची प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. त्यांची पहिली नियुक्ती सोलापूर येथे असिस्टंट कलेक्टर म्हणून झाली. नंतर ते क्रमाने नाशिक, खानदेश आणि पुणे येथे त्याच पदावर होते. त्या काळात निवडक आयसीएस अधिकार्‍यांची न्यायखात्यात बदली (किंवा प्रतिनियुक्ती) होत असे. त्यानुसार १९३३मध्ये चैनानींची बदली न्यायखात्यात झाली. त्यात ते आधी पुणे येथे सहायक न्यायाधीश आणि नंतर सोलापूर येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. १९३५मध्ये चैनानी यांची नियुक्ती तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सचिव म्हणून झाली. १९३५च्या कायद्यानुसार निवडणुका झाल्यानंतर १९३७मध्ये मुंबई प्रांताची विधानसभा अस्तित्वात आली; चैनानींची नियुक्ती या विधानसभेचे पहिले सचिव म्हणून झाली. त्यांनीच या नव्या विधानसभेच्या कामकाजाचे नियम तयार केले. याशिवाय या पदावरील त्यांच्या कारकिर्दीच्या काळात अनेक महत्त्वाच्या कायद्यांचे मसुदे तयार करण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. मुंबई औद्योगिक संबंध कायदा (बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन्स अ‍ॅक्ट) हा त्यांपैकी विशेष उल्लेखनीय कायदा होय. त्यानंतर काही काळ ते मुंबई सरकारच्या गृहखात्यात संयुक्त सचिव आणि भारत सरकारच्या गृहखात्यात उपसचिव होते. त्यानंतर ते पुन्हा न्यायखात्यात गेले आणि त्यांची नियुक्ती आधी सुरत व नंतर अहमदाबाद येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून झाली. त्यानंतर १९४७-४८मध्ये त्यांची नियुक्ती तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या मध्य विभागाचे आयुक्त म्हणून झाली. अशा प्रदीर्घ आणि वैविध्यपूर्ण प्रशासकीय, वैधानिक आणि न्यायालयीन अनुभवाच्या पार्श्वभूमीवर चैनानी यांची ऑगस्ट १९४८मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. दहा वर्षांनंतर सप्टेंबर १९५८मध्ये आधी (सरन्यायाधीश न्या.छागला यांच्या अनुपस्थितीत) कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून आणि नंतर डिसेंबर १९५८मध्ये कायम सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयात आय.सी.एस.न्यायाधीश अनेक झाले असले, तरी न्या. चैनानी हे पहिले आणि एकमेव आय.सी.एस. सरन्यायाधीश होत. न्यायाधीश आणि सरन्यायाधीश म्हणून उच्च न्यायालयातील आपल्या सतरा वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत न्या.चैनानी यांनी आपल्या चौफेर अनुभवामुळे आणि नि:स्पृहता, निर्भीडपणा, सहृदयता आणि चांगुलपणा या आपल्या गुणांमुळे एक आदर्श न्यायाधीश म्हणून लौकिक मिळविला. दाव्यांच्या व खटल्यांच्या निकालांना होणारा उशीर शक्य तितका कमी करण्याचे, त्याचप्रमाणे वादी-प्रतिवादींमध्ये (विशेषत: घरमालक-भाडेकरू किंवा जमीनमालक-कुळ यांच्यात) दिलजमाई किंवा तडजोड घडविण्याचे प्रयत्न न्या.चैनानी नेहमी करीत

शिल्पकार चरित्रकोश ५६