पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डाफळे, राजेंद्रसिंह विजयसिंह संरक्षण खंड डाफळे, राजेंद्रसिंह विजयसिंह भूसेना-कॅप्टन वीरचक्र ३० जून १९४३ राजेंद्रसिंह डाफळे यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विजयसिंह डाफळे हेही सैन्यात मेजर या हुद्यावर कार्यरत होते. आपले शिक्षण पूर्ण करून ५ ऑगस्ट १९६७ रोजी राजेंद्रसिंह लष्करात दाखल झाले. त्यांची १ मराठा लाईट इन्फन्ट्री या तुकडीत नेमणूक झाली. आपल्या शौर्यासाठी मराठा लाईट इन्फन्ट्री प्रथमपासूनच प्रसिद्ध होती. दि. १० डिसेंबर १९७१ च्या रात्री कॅप्टन राजेंद्रसिंह डाफळे यांना आपल्या तुकडीसह पूर्व क्षेत्रात एका ठिकाणी रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करण्याची कामगिरी सोपविण्यात आली. शत्रू सैन्याने पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी हल्ला करून तो अडथळा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कॅप्टन डाफळे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली त्यांच्या तुकडीने तो हल्ला परतवून लावला. शिवाय शत्रूची मोठी जीवितहानीही झाली. शत्रूने वेगवेगळ्या दिशेने या तुकडीवर हल्ला करून त्यांना काबिज करण्याचा प्रयत्न केला. परंतु कॅप्टन डाफळे यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू असतानाही प्रत्येक खंदकात जाऊन आपल्या तुकडीतील जवानांना प्रोत्साहन दिले आणि आपले ठाणे मजबूत ठेवले. या त्यांच्या निर्धार, शौर्य व नेतृत्व गुणांसाठी त्यांनी वीरचक्र प्रदान करण्यात आले. ५२६ शिल्पकार चरित्रकोश