पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैद्य, अरुणकुमार श्रीधर संरक्षण खंड

मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ आणि आर्मर्ड कॉर्स सेंटर अँड स्कूलचे कमांडंट अशा महत्त्वाच्या पदांवरही काम केले. जानेवारी १९८० मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरल म्हणून बढती मिळाली. त्यांनी मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स आणि नंतर जनरल ऑफिसर कमांडिग ऑफ अ कॉर्प्स या पदांवरूनही काम केले. १९८१ साली वैद्य यांची पूर्व विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदोन्नती झाली. ईशान्य भागात नागालँडमध्ये जो बंडखोरीचा उद्रेक माजला होता, त्याला आवर घालण्याचे कार्य त्यांनी मोठ्या कौशल्याने केले. बंडखोर नागांचा स्वयंघोषित जनरल मोबू अंगामी व त्याच्या सहकाऱ्यांना जेरबंद करण्यात आले. १९८३ मध्ये त्यांना 'परमविशिष्ट सेवा पदक' प्रदान करून त्यांच्या अत्युच्च गुणवत्तापूर्ण कामगिरीचा गौरव करण्यात आला.

जनरल वैद्य यांनी 'चीफ ऑफ द आर्मी स्टाफ' हे

पद १ ऑगस्ट १९८३ रोजी स्वीकारले आणि ३१ जानेवारी १९८६ पर्यंत ते या पदावर होते. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना 'अतिविशिष्ट सेवा पदक'ही देण्यात आले. याच काळात त्यांनी सुवर्णमंदिरात घुसलेल्या खलिस्तानवादी अतिरेक्यांचा नायनाट करण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लू स्टार' ही सैनिकी कारवाई सुवर्णमंदिरात केली. हा अत्यंत अवघड असलेला निर्णय त्यांनी कर्तव्यपरायण वृत्तीमुळे घेतला. सुमारे चाळीस वर्षांची सेवा अतिशय उत्तम प्रकारे ४८८ संरक्षण खंड बजावून अरुणकुमार वैद्य सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते पुण्यात कोरेगाव पार्क येथे निवृत्तीनंतरचे जीवन सुखाने व्यतीत करण्यासाठी राहायला आले. मात्र 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'चा घेण्यासाठी देशद्रोही खलिस्तानवादी अतिरेक्यांनी वैद्य यांच्या हालचालींवर नजर ठेवून १० ऑगस्ट १९८६ रोजी त्यांची हत्या केली. वैद्य यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' हा सन्मान देऊन सरकारने त्यांच्या देशसेवेचा गौरव केला. स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाच्या वेळी ब्रिटिश पद्धतीची तलवार वापरण्यात येत असे. नागपूर येथील शंकरराव चिटणवीस यांच्या सूचनेला व रेखांकनाला अनुसरून वैद्य यांनी पुढाकार घेऊन २६ जानेवारी १९८६ पासून भारतीय पद्धतीप्रमाणे असलेली बाकदार तलवार वापरण्याचा निर्णय अमलात आणला. जनरल वैद्य यांचे लष्करी नेतृत्त्व अनुपम होते. त्यांनी आपल्या व्यापक आणि दीर्घकालीन अनुभवाच्या बळावर भारतीय सेनेला कुशल नेतृत्त्व देऊन यशाची कमान चढती राखली. अरुणकुमार वैद्य यांचे शिक्षण जेथे झाले त्या अलिबाग येथील टोपीवाला इंडस्ट्रियल हायस्कूलला 'जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल' असे नाव देण्यात आले आहे.

दीपक हनुमंत जेवणे

शिल्पकार चरित्रकोश