पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड मूळगांवकर, हृषिकेश श्यामराव मुळगांवकर, हृषिकेश श्यामराव वायुसेना - एअर चीफ मार्शल महावीरचक्र, परमविशिष्ट सेवा पदक १४ ऑगस्ट १९२० हृषिकेश श्यामराव मुळगांवकर यांचा जन्म गोवा येथे झाला. त्यांचे वडील निष्णात शल्यचिकित्सक श्यामराव मुळगांवकर हे ‘फेलो ऑफ दि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’ (एफ.आर.सी.एस.) ही त्या काळातील सर्वोच्च पदवी मिळविणारे पहिले भारतीय डॉक्टर होते. हृषिकेश मुळगांवकर यांनी केंब्रिज विद्यापीठातून यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी संपादित केली. त्यानंतर ते ब्रिटिश राजवटीतील ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’मध्ये ३०नोव्हेंबर १९४० रोजी दाखल झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या सुमारास त्यांची हवाईदलाची कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या नंबर वन स्क्वॉड्रनला जपान्यांविरुद्ध लढण्यासाठी ब्रह्मदेश आघाडीवर पाठविण्यात आले. रंगून, चितगाव यांसारख्या तळांवरून त्यांनी विमानाच्या २८० तासांच्या २२० चढाया केल्या. ब्रह्मदेशातून परतल्यानंतर ते प्रथम नंबर टेन स्क्वॉॅड्रन आणि नंतर नंबर फोर स्कॉड्रनमध्ये सामील झाले. १९४५मध्ये एक जीवघेणा प्रसंग त्यांच्यावर गुदरला होता. कॉक्स बझारजवळ असलेल्या होवे येथून त्यांनी ‘स्पिटफायर’मधून उड्डाण केले आणि काही क्षणांतच त्यांच्या विमानाचे इंजिनच नादुरुस्त झाले. त्यांनी अगदी कसोशीने समुद्रकिनार्‍यावर ते विमान उतरविण्याचा प्रयत्न केला. ते यात यशस्वी झाले; पण विमान समुद्रात घुसले होते. मुळगांवकर सीटलाच अडकून पडले होते. भरतीचे पाणी वाढू लागल्याने ते बुडण्याची दाट शक्यता होती. तेवढ्यात या अपघातग्रस्त विमानाकडे दोन ब्रिटिश अधिकार्‍यांचे लक्ष गेले. धावतपळत जाऊन त्यांनी मुळगांवकरांना विमानाबाहेर काढले. प्राणावरचे संकट निभावले होते. पाठीच्या पाच मणक्यांना गंभीर इजा झाली होती; पण सहा महिन्यांत ते खडखडीत बरे झाले. फाळणीनंतर काश्मीरवर पाकिस्तानने जेव्हा हल्ला केला, तेव्हा ते क्रमांक एकच्या विंगचे प्रमुख म्हणजे ‘विंग कमांडर’ होते. भारतीय लष्कराला हवाई संरक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. प्रसिद्ध झोजी खिंडीतील लढाईदरम्यान हवाई हल्ल्याचे नेतृत्व त्यांनी स्वत: जातीने केले. होंकर टेम्पेस्ट-२ या विमानातून हल्ले करून त्यांनी शत्रूच्या ताब्यातील मोक्याचा डोमेल पूल उद्ध्वस्त केला होता. या धाडसी, पराक्रमी कामगिरीबद्दल त्यांना ८ डिसेंबर १९५० रोजी ‘महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले. ओरेगॉन विमानांची चाचणी घेण्यासाठी तेे १९५१ मध्ये फ्रान्सला गेले आणि येताना ते स्वत:च विमान चालवीत भारतात परतले. दुसर्‍या पिढीतील लढाऊ विमानांच्या चाचण्या घेण्यासाठी १९५४मध्ये फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये पाठविलेल्या पथकात तेही होते. पुढे १९६२मध्ये त्यांना विमानभेदी क्षेपणास्त्रांच्या अभ्यासासाठी रशियात पाठविण्यात आले. त्यांच्याच शिफारशीनुसार, भारत सरकारने रशियाकडून जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा (सरफेस टू एअर मिसाइल सिस्टिम्स) खरेदी केली. तेव्हापासून भारतात क्षेपणास्त्रांचे युग सुरू झाले, असे म्हणता येईल. मुळगांवकर यांनी आपल्या कारकिर्दीत ६३ प्रकारची वेगवेगळी विमाने चालविली. त्यांपैकी २२ विमाने जेट होती. हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालविण्यासाठी प्रत्येक वेळी काही आठवड्यांचे कन्व्हर्जन ट्रेनिंग घ्यावे लागते, हे लक्षात घेतले तर त्यांचे अष्टपैलुत्व सहजपणे लक्षात येईल. मुळगांवकरांच्या नावे आणखी एक विक्रम जमा होतो. ‘मिग-२१’ हे स्वनातीत । शिल्पकार चरित्रकोश ४७७