पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंजे, बाळकृष्ण शिवराम संरक्षण खंड व्यवसाय आखडता घेतला. टिळक मंडालेहून परतले. त्यानंतर पहिले महायुद्ध सुरू झाले. या संधीचा फायदा घ्यावा आणि सरकारला पाठिंबा देऊन मिळेल तो देशाचा लाभ करून घ्यावा असा टिळकांचा विचार होता. सैन्याची दारे उघडतील आणि सैनिकी शिक्षणाची सोय होईल त्याचा फायदा घ्यायचा. दादासाहेब खापर्डे, लो.अणे, डॉ.हेडगेवार यांनी टिळक विचार प्रणाली नागपूर प्रांतात वाढवली. टिळकांनंतर काँग्रेसचे नेतृत्व म.गांधींकडे गेले. मुंजे यांनी तेव्हाही कायदेभंग चळवळ, जंगल सत्याग्रह यांमध्ये भाग घेतला होता. विहिरीचे पाणी आटवून मीठ तयार केले, वृक्ष तोडण्यासाठी कुर्‍हाड चालविणे या दोन्ही आंदोलनांसाठी जनतेला प्रवृत्त केले. याच काळामध्ये त्यांनी आपले कार्यक्षेत्र बदलले. १९२० नंतर मुसलमान व हिंदू यांच्यात धर्मावरून, त्यातील आचारविचारांवरून वारंवार तेढ निर्माण झाली. पुढे त्याचे पर्यवसान छोट्या-मोठ्या दंगलींत होऊ लागले म्हणून हिंदू महासभेची स्थापना झाली. मुंजे यांनी हिंदुमहासभेत वेगवेगळी पदे भूषवली. १९२७ ते १९३० या काळात मध्यवर्ती असेंब्लीचे ते सभासद होते. तेथे त्यांनी अनेक विषय मांडले. सैनिकी शिक्षण व सैन्याचे हिंदीकरण या विषयांवर त्यांनी आग्रहाचे प्रतिपादन केले. शाळा-महाविद्यालयांतून सैनिकी शिक्षण सक्तीचे करावे असा ठरावही त्यांनी मांडला होता. सैन्यावर होणार्‍या खर्चाचे अभ्यासपूर्ण विवेचन करून त्यातून भारतीय वैमानिक तयार होण्यासाठी एकही पैसा खर्च होत नाही हे त्यांनी दाखवून दिले. इतकेच नव्हे, तर इंग्लंडमधील स्टॅण्डर्ड कॉलेज, बुलविच कॉलेज व डेहराडून कॉलेज येथे सैनिकी शिक्षणासाठी हिंदुस्थानातून निवडल्या जाणार्‍या उमेदवारांची निवड करण्यासाठी समितीवर व्हॉइसरॉयने डॉ.मुंजे यांची नेमणूक केली होती आणि याच काळात भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कलकत्ता, मद्रास, मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणी वसतिगृह काढण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यांची ही कल्पनाच पुढे ‘भोसला सैनिकी शाळे’च्या रूपात साकार झाली. काँगे्रसने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला. तेव्हा भारतातील हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून मुंजे विलायतेला गेले. परिषदेनंतर सर्व प्रतिनिधी परतले; परंतु डॉ.मुंजे मात्र फ्रान्स, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया या देशांतील लष्करी शिक्षणाची पाहणी करण्यासाठी गेले. त्यांनी ड्रिस्डेन व म्युनिक येथील सैनिकी संस्थांची माहिती करून घेतली. प्रसिद्ध जर्मन सेनानी फील्ड मार्शल मॅकेन्सन यांची त्यांनी आवर्जून भेट घेतली. इटलीत त्यांनी सैन्य आणि सैनिकी शाळा पाहिल्या. युरोपमधील सैन्यबळ आणि सैनिकी शिस्त यांमुळे प्रभावित होऊन भारतात सैनिकी शाळा स्थापण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी सैनिकी शिक्षणाचा अभ्यास करून मुंबईला जमनादास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्वतंत्र हिंदुस्थानच्या संरक्षणाची व्यवस्था’ या विषयावर भाषण दिले. काळाची गरज ओळखून राष्ट्रीय विचारांनी प्रेरित अशा ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून वयाच्या चौसष्टाव्या वर्षी १९३७मध्ये त्यांनी भोसला सैनिकी शाळा (भोसला मिलिटरी स्कूल) सुरू केले. नाशिकजवळ एकशे पंचवीस एकर जमिनीवर हे विद्यालय आहे. तत्कालीन तीन लाख रूपये खर्च करून हे विद्यालय उभारले गेले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी ५जून१९३७ रोजी या शाळेचे उद्घाटन झाले. या शाळेच्या स्थापनेसाठी अंमळनेरपासून कराची व लाहोरच्या व्यापार्‍यांपर्यंत आणि निजामापासून ब्रिटिश अधिकार्‍यांपर्यंत सर्वांकडून त्यांनी आर्थिक सहकार्य मिळवले. डॉ.मुंजे यांचे वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी नाशिक येथेच निधन झाले. - रोहिणी गाडगीळ, भारद्वाज रहाळकर

शिल्पकार चरित्रकोश म ४७६