पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड मुळगांवकर, हृषिकेश श्यामराव (ध्वनीच्या वेगापेक्षा जलद गतीचे) विमान चालविणारे ते पहिले भारतीय वैमानिक ठरले. वायुसेनाप्रमुख झाल्यानंतरही ते ‘मिग-२१’ चालवीत असत. वायुसेनेला स्वनातीत युगात नेणारे युगपुरुष असे त्यांचे सार्थ वर्णन केले जाते. दि.३० नोव्हेंबर १९४० ते दि.१ सप्टेंबर १९७८ या प्रदीर्घ सेवा कालावधीत त्यांनी जबाबदारीची अनेक पदे भूषविली. त्यांनी स्टाफ आणि ऑपरेशनल अशा दोन्ही प्रकारच्या सांभाळलेल्या जबाबदार्‍या पाहिल्या, तर त्यांच्यातील विलक्षण गुणवत्ता, क्षमता व कौशल्याची कल्पना येते. त्यांनी डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स (हवाई मुख्यालय), डायरेक्टर ऑफ पॉलिसी प्लॅन्स (हवाई मुख्यालय), नॅशनल डिफेन्स कॉलेजचे कमांडंट, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (सेंट्रल कमांड), एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (वेस्टर्न कमांड) अशी पदे भूषविली. १९७१च्या बांगलादेश मुक्तियुद्धात ते वायुसेनेचे उपप्रमुख होते. त्यांच्या गौरवशाली सेवेबद्दल त्यांना १९७६मध्ये ‘परमविशिष्ट सेवा पदका’ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच १ फेब्रुवारी १९७६ रोजी त्यांची वायुसेना प्रमुखपदी (चीफ ऑफ एअर स्टाफ) नियुक्ती करण्यात आली. वायुसेनाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी ओळखली जाईल: एक म्हणजे हवाई सुरक्षाविषयक नियमावलींची उच्च कोटीची अंमलबजावणी. स्टेशन कमांडर असल्यापासून ते हवाई सुरक्षेबाबत कमालीचे जागरूक होते. त्या संदर्भात विविध सुधारणा आणि नियमांची अंमलबजावणी करण्यामध्ये त्यांचा दृष्टिकोन अत्यंत गांभीर्यपूर्ण होता. याचा परिणाम स्वाभाविकपणे जबरदस्त होता. त्यांच्या कारकिर्दीत हवाई अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले होते. त्यांची दुसरी कामगिरी म्हणजे, सात वर्षांपासून प्रलंबित असलेला जाग्वार विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव त्यांनी मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळाकडून चिकाटीने, जिद्दीने संमत करून घेतला. याच जाग्वारमुळे संपूर्ण पाकिस्तान प्रथमच भारतीय वायुसेनेच्या मार्‍याच्या टप्प्यात आला. आजही ही विमाने वायुसेनेचा कणा आहेत. निवृत्तीनंतर मुळगांवकर पुण्यात स्थायिक झाले आहेत. - संतोष कुलकर्णी

  • * *

४७ शिल्पकार चरित्रकोश