पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भिडे, विजयकुमार विनायक संरक्षण खंड भूसेनेच्या पूर्व विभागाचे प्रमुख लेफ्ट. जन. अरोरा आणि ‘चिफ ऑफ स्टाफ’ लेफ्ट. जन. जे.एफ.आर. जेकब हे होते. या युद्धाच्या वेळी पूर्व सीमेवर नद्या ओलांडण्याचे सैनिकी अभियांत्रिकी साहित्य वेळेत पोहोचले नव्हते. तेे सर्व साहित्य रायपूर येथील सैन्य अभियांत्रिकी भांडारात होते. या साहित्याशिवाय नद्यांच्या मुखांनी भरलेल्या पूर्व पाकिस्तानवर खोलवर चढाई करणे शक्य नव्हते. पाकिस्तानी सैन्याने सर्व पूल उद्ध्वस्त केले होते. अखेर भूसेनेच्या पूर्व विभागाने पूर्व पाकिस्तानवर (आताचा बांगला देश) संपूर्ण आक्रमण करून बांगला देश मुक्त करण्याचे ठरविले. त्यासाठी लेफ्ट. जन. अरोरा यांनी विजय भिडे यांना सर्व अभियांत्रिकी सहकार्य करण्यास सांगितले. मुख्य अभियंता भिडे यांनी आपले सर्व संपर्क आणि कौशल्य पणाला लावून रायपूर येथील भांडारातून सर्व आवश्यक अभियांत्रिकी साहित्य सीमा भागात नियोजित ठिकाणी वेळेवर पोहोचेल याची व्यवस्था केली. पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्तापकांनी या साहित्याच्या वाहतुकीची चोख व्यवस्था केली. तीन आठवड्यात सर्व साहित्य नियोजित स्थळी पोहोचल्यावर लगेच पूर्व पाकिस्तानवर चढाई सुरू झाली. लवकरच पूर्व पाकिस्तानचा पाडाव होऊन बांगला देश मुक्त करण्यात आला. चौराण्ण्यव हजार पाकिस्तानी युद्धकैदी भारताच्या ताब्यात आले. या युद्धातील युद्धकैद्यांना भारतात आणण्याचे काम मोठे होते. या परिसरातील सर्व खाजगी नावा व जहाजे ताब्यात घेऊन भिडे यांनी या युद्धकैद्यांना नारायणगंज येथून कलकत्त्यात आणले. पाकिस्तानने उद्ध्वस्त केलेले सर्व पूल पुन्हा बांधण्याचे अत्यंत महत्त्वाचे कामही विजय भिडे यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांच्या अखत्यारीतील सैनिकी अभियांत्रिकी दलांनी पाकिस्तानी फौजांनी उद्ध्वस्त केलेले रस्ते, विमानतळ, बंदरे इत्यादींची अत्यंत वेगाने पुनर्बांधणी केली. त्यासोबतच विजय भिडे यांच्यावर मे. जन. सरकार यांच्यासोबत नवनिर्मित बांगला देशच्या प्रशासनाची घडी घालण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. युद्धापूर्वी पाकिस्तानी अत्याचारांमुळे लपून बसलेल्या सर्व नागरी प्रशासनातील अधिकार्‍यांना शोधून त्यांना प्रशासनातील योग्य त्या जागांवर प्रस्तापीत करण्याचे प्रचंड कार्य विजय भिडे आणि मे. जन. सरकार यांनी पार पाडले. विजय भिडे यांच्या नेतृत्त्वाखालील अभियांत्रिकी विभागांनी प्रचंड वेगाने केलेल्या उच्च दर्जाच्या कार्यामुळे १९७१ चे भारत-पाक युद्ध (बांगला देश मुक्ती युद्ध) हे ‘अभियंत्यांचे युद्ध’ (‘इंजिनिअर्स वॉर’) म्हणून ओळखले जाते. या युद्धानंतर काही काळाने विजय भिडे यांची भूसेनेच्या दक्षिण विभागाचे मुख्य अभियंता म्हणून झाली. हा कार्यभार सांभाळल्यावर लगेच त्यांची मेजर जनरलपदी पदोन्नती झाली आणि त्यांची नियुक्ती सीमा रस्ते संघटनेच्या (‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’) महासंचालकपदी झाली. १९७६ मध्ये ते सेनेतून निवृत्त झाले. त्यांच्या उत्तम दर्जाच्या सेवेसाठी आणि विविध युद्धांमधील उत्तम कामगिरीसाठी त्यांचा ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ देऊन सन्मान करण्यात आला. नंतर तीन वर्षे विजय भिडे अबुधाबीमधील नागरी रस्ते बांधणीसाठी तेथील शासनाचे सल्लागार होते. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. - राजेश प्रभु साळगांवकर

  • * *

शिल्पकार चरित्रकोश ४७३