पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पित्रे, शशिकांत गिरिधर संरक्षण खंड (डि-माईन) करते. मात्र जगभरातील इतर सेना आणि सशस्त्र अतिरेकी गट असे करीत नाहीत. युद्धोत्तर काळात त्या भूसुरुंगांमुळे दरवर्षी तेरा कोटी निष्पाप नागरिक अपंग होतात आणि चोवीस हजार नागरिक मारले जातात. त्यातील तीस टक्के लहान मुले असतात. जगभरात असे विविध ठिकाणी पेरलेले भूसुरुंग नष्ट करणे व सुरुंगक्षेत्र साफ करून तो भूभाग सुरक्षित करणे हे एक उच्च प्रशिक्षिणाची आवश्यकता असलेले तंत्रकुशल कार्य आहे. याच कार्यासाठी मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी ‘हॉरिझॉन’ नावाची एक स्वयंसेवी संस्था २००१ मध्ये अन्य सहकार्यांसमवेत स्थापन केली आहे. ही अशा प्रकारचे कार्य करणारी एकमेव आशियायी संस्था आहे. ही संस्था राष्ट्रसंघाच्या (युनो) मार्गदर्शनाखाली कार्य करते. जगात अशा केवळ अकरा संस्था आहेत. शशिकांत पित्रे स्वतः अभियंता असल्याने हे कार्य व त्यासाठीचे प्रशिक्षित मनुष्यबळ उभे करणे त्यांना अवघड गेले नाही. या संस्थेचे सर्व कर्मचारी व स्वयंसेवक हे भूतपूर्व सैनिक व सेनाधिकारी असतात. २००३मध्ये या संस्थेने श्रीलंकेत सुरुंग नष्ट करण्याचे कार्य सुरू केले. त्यानंतर आजवर जगभरातील विविध ठिकाणचे भूसुरुंग नष्ट करण्याचा दरवर्षी एक प्रकल्प नॉर्वेचे सरकार या संस्थेला देत आले आहे. २००९ पासून भारत सरकारही या संस्थेला अशाच स्वरूपाच्या कार्यासाठी निमंत्रित करू लागले आहे. जॉर्डनमध्येही या संस्थेने अशा स्वरूपाचे कार्य केले आहे. आजवर शशिकांत पित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने जगभरात विविध ठिकाणचे दीड लाख भूसुरुंग नष्ट केले आहेत तर न फुटलेले धोकादायक असे सहा हजार बॉम्ब निकामी केले आहेत. त्याचबरोबर उत्तर आणि पूर्व श्रीलंकेत ही संस्था लढाईमुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे कार्य करते आहे. अशा प्रकारच्या कार्यासाठी राष्ट्रसंघाची मान्यता मिळालेली आणि ‘आय.एस.ओ.९०००: मानांकन मिळालेली ही पहिली संस्था आहे. शशिकांत पित्रे हे अन्य अनेक सामाजिक कार्यांशी व संस्थांशी संबंधित आहेत. अपंग सैनिकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असणार्‍या क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटचे ते एक विश्वस्त आहेत. - राजेश प्रभु साळगांवकर

  • * *

४६८ शिल्पकार चरित्रकोश