पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड परमेश्वरन, रामस्वामी सैनिकांसाठी त्यांनी केलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे १९९१मध्ये प्रजासत्ताक दिनी त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरविले गेले. महाराष्ट्र शासनानेही त्यांना १९९०मध्ये ‘महाराष्ट्र गौरव’ हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. दि.२९ फेब्रुवारी १९९२ या दिवशी ते सेवानिवृत्त झाले. सैन्यात केलेल्या कामगिरीची योग्य दखल घेत भारत सरकारने यवतमाळ येथे त्यांना ४००० चौरस फुटांचा भूखंड देऊ केला. पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपला हा भूखंड त्यांनी विनामोबदला स्थानिक प्रशासनास परत केला. त्या जागेवर आज ‘वीरमाता रमाबाई पंडित वसतिगृह’ ही इमारत उभी आहे. निवृत्तीनंतरचे आयुष्यही त्यांनी समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. अपंग जवानांसाठीची क्वीन मेरी तंत्रशिक्षण संस्था, पुण्यातील सैनिकी तंत्रसंस्था, पुण्यातील मध्यवर्ती धोरण संशोधन संस्था, रत्नागिरीतील फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, नवी दिल्लीतील केंद्रीय सैनिकी शाळेची मध्यवर्ती समिती व महाराष्ट्र राज्य सैनिकी समिती या संस्थांमध्ये ते स्वयंसेवी कार्य करत आहेत. - ज्योती आफळे

परमेश्वरन, रामस्वामी भूसेना - मेजर परमवीरचक्र १३ सप्टेंबर १९४६ - २५ नोव्हेंबर १९८७ रामस्वामी परमेश्वरन यांचा जन्म मुंबई येथे झाला. एस.आय.ई.एस. शाळेत व महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. पंधराव्या महार रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर जानेवारी १९७२ मध्ये ते पाचव्या महार रेजिमेंटमध्ये रुजू झाले. या वेळी ते मिझोराम व त्रिपुराच्या डोंगरी भागात घुसखोरांशी लढत होते. पुढे त्यांची आठव्या महार रेजिमेंटमध्ये नियुक्ती झाली. ही रेजिमेंट श्रीलंकेला जाणार होती. एक्क्याण्णवव्या इन्फन्ट्री ब्रिगेड व चौपन्नाव्या इन्फन्ट्री डिव्हिजन यांचा एक भाग म्हणून या रेजिमेंटने ‘ऑपरेशन पवन’मध्ये भाग घेतला होता. श्रीलंकेत आलेली भारतीय शांतिसेनेची ही पहिली बटालियन होती. श्रीलंकेत या सैन्याने एल.टी.टी.ई.विरुद्ध झालेल्या अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. कान्तारोदाईमध्ये मेजर रामस्वामी परमेश्वरन शूरपणे लढले. २४ नोव्हेंबर १९८७ रोजी या खेड्यातील एका घरामध्ये, शस्त्रे व दारूगोळा यांचा मोठा साठा उतरवला असल्याची माहिती सैन्याला समजली. बातमीचा खरेपणा पडताळून पाहण्यासाठी कॅप्टन डी.आर. शर्मा यांच्या नेतृत्वाखालील वीस जणांच्या तुकडीस पाठवण्यात आले. गस्त घालणार्‍या पहारेकर्‍यांवर सदर घराच्या जवळच्या देवळामधून गोळ्या झाडण्यात आल्या. गस्त घालणार्‍यांनीही गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. त्यांनी उद्विल येथील बटालियनला माहिती कळवली की ती जागा एल.टी.टी.ई.च्या ताब्यात आहे व आधीच्या अनुमानापेक्षा त्यांची ताकद अधिक वाटत आहे. त्या वेळी मेजर रामस्वामी परमेश्वरन यांनी या जागेवर हल्ला करण्याचे ठरविले. रात्री साडेआठ वाजता त्यांनी आपल्या कंपनीमधून एक तुकडी निवडून सोबत घेतली आणि ते कॅप्टन शर्मांच्या तुकडीला जाऊन मिळाले. या दोन्ही तुकड्या मग संशयास्पद घराकडे निघाल्या. परमेश्वरन यांची कंपनी त्या घराजवळ दि.२४/२५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री दीड वाजता पोहोचली. तिथे त्यांना कसलीही हालचाल आढळली नाही. त्यांनी त्या जागेला वेढा घातला आणि पहाटे शोध घ्यावयाचे ठरवले.

शिल्पकार चरित्रकोश ४६१