पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ट । संरक्षण खंड टिपणीस, अनिल यशवंत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एन.डी.ए.) टिपणीस हे चीफ इन्स्ट्रक्टर (एअर) आणि बटालियन कमांडर होते. १९८३मध्ये ग्रूप कॅप्टन असताना मिराज-२००० प्रकल्पाचे गटप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक फ्रान्समध्ये झाली. मिराज-२००० विमाने भारतात आणण्यात त्यांचा सर्वांगीण सहभाग व पुढाकार होता. तीन वर्षांनी भारतात परतल्यावर त्यांची ‘एअर कमोडोर’ म्हणून बढती झाली व ते मिराज-२००० विमानांची दोन स्क्वॉड्रन्स असणार्‍या, ग्वाल्हेरच्या वायुसेना तळाचे ‘एअर ऑफिसर कमांडिंग’ झाले. १९८९मध्ये त्यांनी दिल्लीच्या ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’मधील प्रशिक्षण पूर्ण केले. एअर व्हाइस मार्शल म्हणून जून १९९२मध्ये टिपणीस यांना पदोन्नती मिळाली. वायुसेना मुख्यालयात, ‘असिस्टंट चीफ ऑफ दि एअर स्टाफ’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जम्मू आणि काश्मीर विभागाचे ‘एअर ऑफिसर कमांडिंग’ म्हणून त्यांनी जून १९९३मध्ये पदभार स्वीकारला. प्रत्येक पदावर कार्यरत असताना त्यांनी कौशल्य व क्षमता यांचे मापदंड स्थापन केले. सप्टेंबर १९९४मध्ये पदोन्नती होऊन ते ‘एअर मार्शल’ झाले. प्रथम वायुसेनेच्या पूर्व विभागाचे व फेब्रुवारी १९९५मध्ये ते पश्चिम विभागाचे ‘सीनियर एअर स्टाफ ऑफिसर’ झाले. ऑगस्ट १९९५मध्ये ते वायुसेनेच्या अग्रिम व महत्त्वपूर्ण पश्चिम विभागाचे ‘एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ झाले. एप्रिल १९९७मध्ये ते वायुसेना उपाध्यक्ष व दि.३१ डिसेंबर १९९८रोजी ‘एअर चीफ मार्शल’ झाले. वायुसेनाध्यक्ष असतानाही ते सर्वत्र सतत स्वत: उड्डाण करीत. १९९९च्या कारगिल युद्धात त्यांनी मिग-२७ व मिराज-२००० विमानांमध्ये स्वत: उड्डाणे करून गौरवशाली इतिहास रचला. पदावर असलेल्या वायुसेनाध्यक्षाने, स्वत: प्रत्यक्ष हवाईयुद्धात उतरून, वैमानिक म्हणून सक्रिय होऊन भाग घेतला. टिपणीस यांच्या नेतृत्वाखाली मिराज-२०००च्या वैमानिकांनी शत्रूची दाणादाण उडवून दिली. शत्रूची सर्वांत मोठी ‘मंथो ढालो’ येथील छावणी अगदी जमीनदोस्त करून टाकली. शत्रूचे रसदीचे सर्व मार्ग नष्ट केले. येथूनच कारगिल युद्धाला, आपल्या दृष्टीने विधायक वळण लागले व पाकिस्तानचा पराभवची निश्चिती झाली. अनिल टिपणीस यांनी उत्तम व उत्कृष्ट नेतृत्व केले. तसेच त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव म्हणून त्यांना ‘वायुसेना पदक’, ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ व ‘परमविशिष्ट सेवा पदक’ हे सन्मान प्राप्त झाले. ते राष्ट्रपतींचे मानद एडीसीही होते. ते एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुविख्यात रक्षा विशेषज्ञ आहेत. - विंग कमांडर (निवृत्त) अशोक मोटे

  • * *

शिल्पकार चरित्रकोश ४४१