पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डायस, फ्रान्सिस तिबुर्तीयस संरक्षण खंड । ड डायस, फ्रान्सिस तिबुर्तीयस भूसेना - लेफ्टनंट जनरल परमविशिष्टसेवापदक, अतिविशिष्टसेवापदक, वीरचक्र ४ ऑक्टोबर १९३४ फ्रान्सिस तिबुर्तीयस डायस यांचा जन्म पुणे येथे झाला. सी. एन. डायस हे त्यांचे वडील. फ्रान्सिस यांचे शिक्षण मुंबईतील वांद्रे येथे सेंट स्टॅनिसलस विद्यालयात झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ४ डिसेंबर १९५४ रोजी ते अकराव्या गुरखा रायफल्समध्ये दाखल झाले. १९७१ मधील पाकिस्तान युद्धात त्यांची बटालियन पूर्वेकडील सीमेवर तैनात होती. त्यावेळी पाकिस्तानविरुद्ध घनघोर युद्धास प्रारंभ झाला. १२ डिसेंबर १९७१ रोजी फ्रान्सिस यांना शत्रूने काबीज केलेल्या ठाण्यावर हल्ला करण्याचा आदेश देण्यात आला. पुन्हा दुसर्‍या दिवशी, १३ डिसेंबरला त्यांच्या बटालियनला पाकिस्तानचे दोन पूल ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली, तर सलग तिसर्‍या दिवशी त्यांना बोग्रा या गावाचा काही भाग ताब्यात घेण्याचा आदेश देण्यात आला. फ्रान्सिस डायस यांच्या नेतृत्वाखालील बटालियनने सलग तिन्ही दिवस त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी चोखपणे बजावली. त्यांच्या या अतुलनीय शौर्यामुळे पाकिस्तानी सैन्याचे जबर नुकसान झाले. त्या पाठोपाठ महास्थाना येथे त्यांनी शत्रूच्या मुख्यालयावर हल्ला चढवीत त्यांच्या अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना ताब्यात घेतले. पाठोपाठ त्यांनी शत्रूने उभारलेले अनेक पूलही स्फोटकांद्वारे उद्ध्वस्त केले. त्यांच्या बटालियनच्या देदीप्यमान कामगिरीमुळे भारतीय सैन्याला बोग्रा हे महत्त्वाचे गाव ताब्यात घेणे शक्य झाले. तसेच भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य गाजवून नेत्रदीपक यश मिळविले आणि प्रचंड संख्येने शत्रूसैनिकांना कैद केले. या स्पृहणीय कामगिरीमुळे फ्रान्सिस डायस यांना १२ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र’ सन्मान घोषित करण्यात आला. सेवेच्या पुढील काळात ते लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचले. तसेच नंतर त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ व ‘परमविशिष्ट सेवा पदका’नेही सन्मानित करण्यात आले. - वर्षा जोशी-आठवले/धनंजय बिजले

४४२ शिल्पकार चरित्रकोश