पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टिपणीस, अनिल यशवंत संरक्षण खंड टिपणीस, अनिल यशवंत टिपणीस, अनिल यशवंत वायुसेना - एअर चीफ मार्शल परमविशिष्ट सेवा, अतिविशिष्ट सेवा, वायुसेना पदक १५ सप्टेंबर १९४० अनिल यशवंत टिपणीस यांचा जन्म नाशिकजवळील देवळाली येथे झाला. देवळाली येथील बार्न्स विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण पार पडले. जानेवारी १९५६मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एन.डी.ए.) पंधराव्या तुकडीमध्ये त्यांची निवड झाली. त्यांचे वडीलही सैन्याधिकारी होते. त्यामुळे घरातूनही सैन्यातल्या प्रवेशाला कायमच पाठिंबा होता. लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून १९५९च्या जानेवारीमध्ये उड्डाण प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांनी एअर फोर्स फ्लाइंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते गोल्फमध्ये निष्णात असून मैदानी खेळांची त्यांना आवड आहे. टिपणीस यांना लढाऊ वैमानिक म्हणून २८ मे १९६० रोजी नियुक्ती मिळाली. वैमानिकी प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट ठरल्याने त्यांना ‘मजूमदार ट्रॉफी’ मिळाली. त्यानंतर टिपणीस विविध लढाऊ स्क्वॉड्रन्समध्ये लढाऊ वैमानिक म्हणून अग्रिम हवाई मोर्च्यांवर कार्यरत होते. त्यांची पहिली नियुक्ती ‘हंटर’ स्क्वॉड्रनमध्ये झाली. १९६३मध्ये भारतात मिग-२१ विमाने आणून पहिली ‘सुपरसॉनिक स्क्वॉड्रन’ म्हणून अठ्ठाविसावी स्क्वॉड्रन निर्माण करणार्‍या पहिल्या वैमानिकांपैकी ते एक होते. याच स्क्वॉड्रनमध्ये १९६५च्या भारत-पाक युद्धात मिग-२१चे लढाऊ वैमानिक म्हणून त्यांचा सक्रिय सहभाग होता. ‘पायलट-अटॅक इन्स्ट्रक्टर’ होण्याच्या प्रशिक्षणात पुन्हा सर्वोत्तम ठरल्याने, त्यांना १९६६मध्ये ‘नरोन्हा ट्रॉफी’ मिळाली. भारत सरकारतर्फे इराकी वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी, ‘पायलट-अटॅक इन्स्ट्रक्टर’ म्हणून ते जानेवारी १९७०मध्ये इराकला गेले. इराकहून परतल्यावर मिग-२१ विमानांच्या पंचेचाळिसाव्या स्क्वॉड्रनमध्ये ते फ्लाइट कमांडर म्हणून रुजू झाले. १९७३मध्ये भारतीय वायुसेनेच्या ‘टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’च्या (टॅकडे) उड्डाण प्रशिक्षण अभ्यासक्रमात सर्वोत्तम ठरल्याने त्यांना ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ (मानाची तलवार) मिळाली व ते त्या संस्थेत फ्लाइट कमांडर म्हणून नियुक्त झाले. त्यांनी हवाई युद्धाची योजना व लढाऊ वैमानिकी रणनीती ह्या विषयांवर अध्ययन व संशोधन केले. वेलिंग्टन येथे १९७५मध्ये डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये त्यांनी सैनिकी प्रशासनाचे प्रशिक्षण पूर्ण केले. जुलै १९७७मध्ये सुधारित ‘मिग-२१ बिझ’ विमानांच्या तेविसाव्या स्क्वॉड्रनचे ते विंग कमांडर दर्जाचे कमांडिंग ऑफिसर झाले. ‘इंडो-सोव्हिएट जॉइंट स्पेस मिशन’साठी निवड झालेल्या चार अधिकार्‍यांपैकी ते एक होते. त्यांनी सर्व प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्णही केले, त्यांची अंतिम निवडही झाली; पण त्यांना राखीव दलात ठेवण्यात आले. शिल्पकार चरित्रकोश ४४०