पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जठार, अरविंद नीळकंठ संरक्षण खंड जठार, अरविंद नीळकंठ जठार, अरविंद नीळकंठ भूसेना - ब्रिगेडियर महावीरचक्र, अतिविशिष्टसेवापदक २० डिसेंबर १९२३ - ९ नोव्हेंबर १९९१ अरविंद नीळकंठ जठार यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील नीळकंठ श्रीराम जठार हेही लष्करात लेफ्टनंट कर्नल या पदावर होते. पुण्यातील श्री शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूलमध्ये (एस.एस.पी.एम.एस.) त्यांचे शालेय शिक्षण झाले. मुंबईतल्या एलफिन्स्टन महाविद्यालयात ते पुढील शिक्षण घेत असतानाच त्यांना इमर्जन्सी कमिशनच्या माध्यमातून सैन्यात भरती होण्याची संधी मिळाली. १९४२मध्ये ते सैन्यात भरती झाले. बंगळूर येथे नऊ महिने प्रशिक्षण झाल्यानंतर डिसेंबर १९४२मध्ये ते लेफ्टनंट पदावर रुजू झाले. त्या काळी भारतावर इंग्रजांचे राज्य असल्याने त्यांची लढण्यासाठी इटली येथे रवानगी करण्यात आली होती. १९४४मध्ये ते इटलीमध्ये लढताना जखमी झाले. त्यानंतर त्यांना भारतात आणण्यात आले. उपचारानंतरही त्यांचा एक पाय तोकडा झाला होता. पण तरीही ते सैन्यात कार्यरत राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ते सहाव्या डी.सी.ओ. लान्सर या रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट पदावर होते. त्या वेळी त्यांच्या समवेत झिया उल हक हेही होते. या रेजिमेंटमध्येे मुसलमान संख्येने अधिक असल्याने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यांतले बहुतेक सैनिक पाकिस्तानात गेले. त्या वेळी अरविंद जठार यांची रवानगी सेंट्रल इंडिया हॉर्स रेजिमेंटमध्ये झाली. ते या रेजिमेंटमधून काश्मीरमधल्या लढाईत सहभागी झाले. ८ एप्रिल १९४८ रोजी त्यांच्या रेजिमेंटच्या सहकार्याने चौथ्या डोग्रा पलटणीने जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी टोळीवाल्यांनी ताब्यात घेतलेल्या बरवलीवर हल्ला केला. जठार सुरुवातीच्या कंपनीबरोबर होते. शत्रूने तुफान गोळीबार करून कंपनीचा हल्ला थोपविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जठार गोळ्यांचा वर्षाव झेलत सफाईने पुढे गेले. त्यांनी आपल्या रणगाड्यांना शत्रूची ठिकाणे निर्देशित केली. १० एप्रिल १९४८ रोजी झालेल्या लढाईत अरविंद जठार पहिल्या रणगाड्याचे नेतृत्व करीत होते. तावी नदीच्या पात्रातून रणगाडे जाताना ते या पात्रातील गाळात रुतून बसू नयेत म्हणून जठार यांनी नदीच्या पात्रातून चालत चालत रणगाडे चालकांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांना प्रचंड गोळीबाराचा सामना करावा लागला. तो चुकवत त्यांनी रणगाड्यांना सुरक्षितपणे तावी नदीच्या पात्रातून पुढे नेले. रणगाड्यांच्या तीनपट वेगाने पुढे जाऊन ते चिंगास (विभागीय नकाशातील एम.आर. स्क्वेअर ३६०९) या नियोजित जागी पोहोचले होते. १२ एप्रिल १९४८ रोजी राजौरी येथे रणगाड्यांना मार्गदर्शन करताना जठार यांनी अकरा वेळा नदी ओलांडली. राजौरीवर कब्जा मिळवल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार अडीच मैल परत जाऊन नदीच्या पात्रात रुतलेल्या दोन रणगाड्यांना त्यांनी यशस्वीपणे बाहेर काढले. जठार यांच्या धाडसामुळे ४३२ शिल्पकार चरित्रकोश