पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड चिटणीस, हेमंत रामकृष्ण त्यांना एअर व्हाईस मार्शल म्हणून पदोन्नती मिळाली व ते एअर चीफ मार्शल मुळगांवकर यांच्या हाताखाली ‘असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ - प्लॅनिंग’ म्हणून दिल्लीस आले. त्यांच्या काळात जग्वार विमाने वायुसेनेने खरेदी केली. १९७४ मध्ये त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. भारत सरकारने १९७७ मध्ये त्यांना अमेरिकेत आंतरराष्ट्रीय संरक्षण व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी पाठविले. १९७८ मध्ये त्यांना एअर मार्शल पद मिळाले. दुरुस्ती व देखभाल (मेटेनन्स) विभागात ‘एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ म्हणून त्यांची नागपूरला नियुक्ती झाली. हंटर, जग्वार इत्यादी विमानांचा वायुसेनेत समावेश, प्रशिक्षक शाळा (इन्स्ट्रक्टसर्र् स्कूल), सुधारित वेतनश्रेणी इत्यादी सुधारणा त्यांनी केल्या. त्यांची उत्कृष्ट सेवा लक्षात घेऊन सरकारने २६ जानेवारी १९८० रोजी त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करून त्यांचा गौरव केला. लगेचच २९ फेब्रुवारी १९८० रोजी एअर मार्शल हेमंत चिटणीस सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतरही त्यांनी इतर क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंटची त्यांनी शून्यातून सुरुवात केली. तंत्र शिक्षण विभागाकडूनही या संस्थेला मान्यता मिळाली. कुक्कुटपालन व्यवसायातील विविध विषयांचे प्रशिक्षण आज या संस्थेतून दिले जाते. चिटणीस यांचे थोरले चिरंजीव अजय चिटणीस यांनी नौसेनेच्या वायुदलात वैमानिक म्हणून काम केले. त्यांनाही १९८४ मध्ये शौर्यचक्र मिळाले. चिटणीस यांचे धाकटे पुत्र अमोल चिटणीस हेही १९७० मध्ये नौसेनेच्या वायुदलामध्ये दाखल झाले. हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून काम करताना त्यांनीही अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. - वर्षा जोशी-आठवले

  • * *

शिल्पकार चरित्रकोश