पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड चिटणीस, अजय हेमंत च चिटणीस, अजय हेमंत नौसेना - कमोडोर शौर्यचक्र, नौसेना पदक ८ जून १९५० अजय हेमंत चिटणीस यांचा जन्म गुजरात राज्यातील कैरा जिल्ह्यातील पेटलाड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण दिल्ली येथे झाले. नंतर त्यांनी १९६६ मध्ये मुंबईतील भारतीय प्रौद्योगिकी संस्था, पवई (आय.आय.टी.) येथे विद्युत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम सुरू असतानाच त्यांनी १९६९ मध्ये नौसेनेत प्रवेश घेतला. अजय यांच्या मावशीचे पती अ‍ॅडमिरल दया शंकर यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाल्यामुळे त्यांनी नौसेनेत प्रवेश घ्यायचे ठरवले. त्यांचे वडील हेमंत चिटणीस वायुसेनेत होते. त्यामुळे घरातून पाठिंबा होताच. ऑक्टोबर १९६९ ते जून १९७१ या कालावधीत त्यांना कोची, जोधपूर, हैदराबाद येथे प्रशिक्षण मिळाले. १९७४ साली त्यांचा विवाह नाशिक सिक्युरिटी प्रेसचे व्यवस्थापक चिटणीस यांची कन्या आदिती हिच्यासोबत झाला. नौसेनेतील कारकिर्दीत त्यांनी गोवा, मुंबई, विशाखापट्टणम, कोची, नवी दिल्ली आणि वेलिंग्टन येथील नौसेनेच्या तळांवर काम केले. विमानोड्डाण आणि लढाऊ विमानोड्डाण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हेलिकॉप्टर उड्डाणासाठी त्यांची निवड झाली. वयाच्या पंचविसाव्या वर्षी जहाजावरून हेलिकॉप्टरचे उड्डाण करणारे त्या वेळचे ते सर्वांत तरुण अधिकारी होते. आज जहाजावरून होणार्‍या हेलिकॉप्टर उड्डाणाचे ते तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उत्तम आणि सातत्यशील प्रगतीमुळे रशियन बनावटीच्या हेलिकॉप्टर्सवर प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आलेल्या गटामध्ये त्यांची निवड झाली. आय.एन.एस. रजपूत या नव्याने आलेल्या विनाशिकेवर त्यांची वरिष्ठ वैमानिक (सीनियर पायलट) म्हणून निवड झाली. ‘कमाऊ २५’ या पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टरच्या नौसेनेतील आगमनाची त्यांनी पूर्वतयारी केली. तसेच, त्या ताफ्याचे नेतृत्वही अजय चिटणीस यांनी केले. १९८४ मध्ये आय.एन.एस.रजपूत या युद्धनौकेला दोन पदके मिळाली. मासेमारीसाठी समुद्रात गेलेले १५०० कोळी अचानक आलेल्या वादळामुळे भरकटले. या कोळ्यांची तेथून सुटका करण्यासाठी एक मोहीम राबवली गेली. या मोेहिमेच्या २५ तासांच्या काळात हे हेलिकॉप्टर फक्त इंधन भरण्यासाठी जहाजावर उतरत होते. त्या वेळी जहाजावर कोणीही वैमानिक उपलब्ध नसल्यामुळे चिटणीस यांनी एकट्यानेच ही मोहीम एकहाती पार पाडली. या काळात त्यांनी या कोळ्यांना अन्न आणि पाणी यांचा पुरवठाही केला. तसेच त्यांना किनार्‍यावर परतण्यासाठी मार्गदर्शनही केले. याच मदत व बचाव मोहिमेबद्दल अजय चिटणीस यांना ‘नौसेना’ पदक बहाल करण्यात आले. रशियन बनावटीची हेलिकॉप्टर्स भारतीय नौसेनेत दाखल झाली होती. शिल्पकार चरित्रकोश ४२९