पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

च घाडगे, यशवंत बाळाजी संरक्षण खंड ठाण्याचे रक्षण करणारे अनेक जर्मन सैनिक त्यांनी यमसदनी पाठविले. आपल्याच कैफात घाडगे पुढे सरकत चालले होते. अचानक आपल्याकडील काडतुसे व हातबाँब यांचा साठा संपल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता ते ठाण्याच्या अगदी जवळ आले होते. त्यांनी मग मागचापुढचा विचार न करता आपली बंदूक उलट धरून शत्रूच्या सैनिकांवर झेप घेतली. बंदुकीच्या दस्त्याने हाणामारी करून ते शत्रुसैनिकांना लोळवू लागले. त्यांचा त्वेष पाहून शत्रुसैनिक माघारी पळू लागले. त्यांच्या पलटणीने शर्थ करून ते ठाणे काबीज केले. आपला विजय झाल्याचे लक्षात आल्यावर घाडगे यांनी क्षणभर थांबून मोकळा श्वास घेतला. त्यांचा संपूर्ण देह रक्ताने न्हाला होता. ते शांतपणे उभे राहिल्याचे पाहून जवळच्याच खंदकात लपलेल्या एका जर्मन सैनिकाने संधी साधून त्यांच्यावर गोळी झाडली. या गोळीने अचूक वेध घेतला व घाडगे खाली कोसळले. क्षणार्धात त्यांची प्राणज्योत मावळली. ब्रिटिश सरकारला त्यांच्या या पराक्रमाची दखल घ्यावी लागली. लाल किल्ल्यासमोरील मैदानात भरलेल्या दरबारात त्यांना ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आला. व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल फील्ड मार्शल लॉर्ड वेव्हेल यांच्या हस्ते घाडगे यांच्या वीरपत्नी लक्ष्मीबाईंना हे मानाचे पदक प्रदान करण्यात आले. नाईक यशवंतराव घाडगे यांच्या स्मरणार्थ माणगावच्या मामलेदार कचेरीजवळ त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तेथे दरवर्षी ९ जानेवारीला ‘घाडगे महोत्सव’ साजरा करण्यात येतो. - डॉ.शुभलक्ष्मी मा.जोशी

  • * *

४२८ शिल्पकार चरित्रकोश