पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आमची ही अत्याधुनिक आणि तंत्रकुशल वायुसेना आकाशातून येणा-या कोणत्याही शत्रूचा नि:पात करण्यास सक्षम व सुसज्ज आहे. | आज भारतीय वायुसेना ही हवाई योद्ध्यांनी (एअर वॉरिअर्स) सुसज्ज आणि आत्मविश्वासाने रसरसलेली अशी एक शक्ती आहे. नभः स्पर्शम् दीप्तम्' हे वायुसेनेचे बोधवाक्य आहे. त्याचा अर्थ, तेजस्वीपणे आकाशाला स्पर्श करा, म्हणजेच शौर्याच्या, पराक्रमाच्या तेजाने आकाश जिंका. आपल्या या गौरवशाली परंपरेची जपणूक करण्यास भारतीय वायुसेना सदैव सज्ज आहे. समारोप स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर व नंतर महाराष्ट्रातल्या ज्या शूरवीरांनी आपल्या पराक्रमाने भारतीय सैन्याचा इतिहास गौरवान्वित केला आहे, अशा सर्वांची नोंद या खंडात करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. विविध भारतीय सैनिकी, अर्ध सैनिकी दलात व गुप्तचर खात्यात ज्यांना त्यांच्या कर्तृत्वाने विविध पदकांनी सन्मानित केले आहे अशा महाराष्ट्रातील सर्वांचा समावेश या खंडात करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गेल्या दोन वर्षे हे कार्य सुरु होते. ही माहिती परिपूर्ण नाही व त्यात काही कमतरता असू शकतात याचीही आम्हांला कल्पना आहे. त्या कमतरतांची पूर्ती करण्यासाठी जर सूचना आल्या, तर पुढील आवृत्तीत त्यांचा आम्ही अवश्य विचार करू. या प्रकल्पाच्या रूपाने महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास आम्ही आताच्या पिढीपुढे ठेवत आहोत. महाराष्ट्र राज्याची तरुण पिढी आपल्या कर्तृत्वाने त्यात आणखी भर घालेलच, असा आम्हांला विश्वास वाटतो. भूसेना लेखक : लेफ्ट. जन. दत्तात्रेय ब. शेकटकर (निवृत्त) नौसेना लेखक : ले.क. विनायक श्रीधर अभ्यंकर (निवृत्त) . वायुसेना लेखक : एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) ४१२ शिल्पकार चरित्रकोश