पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| राइट बंधूंनी त्यांचे पहिले ऐतिहासिक विमानोड्डाण १६ डिसेंबर १९०३ या दिवशी केले. त्यानंतर सातच वर्षांनी म्हणजे डिसेंबर १९१० मध्ये भारतातले पहिले विमानोड्डाण अलाहाबाद येथे एका फ्रेन्च वैमानिकाने केल. आणखी तीन वर्षांनी म्हणजे डिसेंबर १९१३ मध्ये उत्तर प्रदेशात सीतापूर या ठिकाणी पहिले लष्करी विमानोड्डाण विद्यालय सुरू करण्यात आले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाले. त्यात ब्रिटनच्या 'रॉयल फ्लाइंग कोअर' या विमानदलात अनेक भारतीय सैनिकांना विमान स्वतः उडविण्याची संधी मिळाली. तिचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. कित्येकांनी शौर्यपदकेही मिळवली. लेफ्टनंट इंद्रलाल रॉय हे 'डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस' या शौर्यपदकाचे पहिले भारतीय मानकरी ठरले. वायुशक्तीचे प्रकटीकरण | नंतरच्या काळात लष्करी कार्यांसाठी विमानांचा उपयोग करणे म्हणजेच वायुसेनेची निर्मिती करणे या बाबतीत अनेक बदल होत गेले. वायुसेनेला ‘वायुशक्ती' असा शब्द वापरला जाणे यातच त्याची अमर्याद शक्ती व्यक्त होते. आज कोणत्याही आधुनिक राष्ट्राच्या युद्धप्रयत्नांमध्ये त्याच्या वायुसेनेचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो आणि तो निर्णायक असतो. अलीकडच्या सर्व आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये हवाई शक्तीचे हे महत्त्व पुन:पुन्हा प्रत्ययास आले आहे. | भारताच्या संदर्भात सांगायचे तर अलीकडच्या कारगिल युद्धात भारतीय वायुसेनेचा सहभाग निर्णायक ठरला. वायुसेनेच्या झंझावाती हल्ल्यांना सुरुवात झाल्यावर घुसखोरांनी भारतीय प्रदेशातून पळ काढला. | आजच्या या सामर्थ्यशाली भारतीय वायुसेनेची सुरुवात मात्र ब्रिटिश शाही वायुसेनेचे एक विस्तारित दल म्हणून झाली. भारतीय वायुसेनेची निर्मिती ८ ऑक्टोबर १९३२ या दिवशी कराची या ठिकाणी, तत्कालीन ब्रिटिशांकित भारत सरकारच्या एका आदेशानुसार भारतीय वायुदल अस्तित्वात आले. | अशा प्रकारे ब्रिटिश रॉयल एअरफोर्सची एक शाखा म्हणून निर्माण झालेली ही भारतीय वायुसेना, काळात, ब्रिटिश वायुसेनेच्याच एकंदर धोरणाप्रमाणे चालावी, यात काहीच आश्चर्य नव्हते. हाताच्या बोटावर मोजण्याएवढे भारतीय सैनिक आणि विमाने यांनी बनलेले ते एक छोटे दल होते. परंतु या भारतीयांनी ब्रिटिशांकडून विमानविद्या अवगत करून घेतली नि प्रत्यक्ष अनुभव व राष्ट्रीय भावना यांच्या जोरावर त्यांनीच स्वतंत्र भारताच्या वायुसेनेचा पाया घातला. त्याची ध्येयधोरणे निश्चित केली. ब्रिटिश सेनापती लेफ्टनंट जनरल अॅण्ड्यू स्कीन हे चीफ ऑफ जनरल स्टाफ या हुद्यावर असताना त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एक महत्त्वाचा अहवाल भारताच्या व्हाइसरॉयना पाठवला. त्यात रॉयल एअर फोर्सच्या धर्तीवर भारतीय वायुदल तुकडीची निर्मिती करण्यात यावी, अशी जोरदार शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार व्हाइसरॉय काउन्सिलने निर्णय घेतला व ८ ऑक्टोबर १९३२ या दिवशी अधिकृत सरकारी राजपत्रामध्ये (गॅझेट) तो जारी करण्यात आला. । | त्या सुरुवातीच्या कालखंडात वायव्य सरहद्द प्रांतातील आक्रमक अफगाणी टोळीवाल्यांचा बंदोबस्त करण्यात लष्कराला मदत करणे, एवढेच भारतीय वायुदलाचे काम होते. वायुदलाकडे काही वेस्टलँड वापिती विमानेच फक्त होती. नंतर १९३९ साली, त्या वेळी फ्लाइट लेफ्टनंटच्या हुद्द्यावर असलेले सुब्रतो मुखर्जी यांची शिल्पकार चरित्रकोश ४०३