पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देशाच्या फाळणीनंतर भारताच्या वाट्याला ३३ युद्धनौका आल्या, तर पाकिस्तानला १६ युद्धनौका बहाल करण्यात आल्या. ब्रिटिशांच्या तालमीत तयार झालेल्या ह्या भारतीय आरमारासाठी सरकारने ब्रिटनकडून दुस-या महायुद्धात लढलेली क्रूझर्स, फ्रिगेट्स, ड्रायझर्स, माइनस्विपर्स इत्यादी प्रकारची जुनी जहाजे, योग्य ती डागडुजी करून घेऊन, विकत घेतली. त्यात आय.एन.एस. दिल्ली, म्हैसूर या क्रूझर्स; व्यास, बेटवा, ब्रह्मपुत्रा या फ्रिगेट्स; रणजित, रजपूत, राणा या डिस्ट्रॉयर्स; गंगा, गोमती, गोदावरी या हंटक्लास विनाशिका; मगर, धरणी, कारवार, शक्ती, विक्रांत या विमानवाहू नौका इत्यादी युद्धनौका भारताने १९५५ ते १९६२ सालापर्यंत संपादन केल्या. भारताची पहिली ध्वजनौका (फ्लॅग शिप) होण्याचा मान भारतीय नौसेना पोत दिल्लीस मिळाला. ह्याच जहाजावरून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी १९५८ साली नौसेनेचा युद्धाभ्यास पाहून पुढील संदेश दिला होता : "भारत हा समुद्राने अगदी लपेटलेला देश आहे. पूर्वीच्या काळी समुद्राशी आपले निकटचे संबंध होते. परंतु नंतर आपण दुर्बळ झालो. आता आपण स्वतंत्र झालो आहोत. त्यामुळे आपली सागरी शक्ती दुबळी राहून चालणार नाही; कारण ज्याचे सागरावर प्रभुत्व आहे त्यापासून भारताच्या स्वातंत्र्याला धोका आहे हा इतिहासाने दिलेला धडा आहे.' ('India is in the very lap of an ocean. Earlier, we had intimate connection with the sea. Later on, we became weak. Now that we are free, we cannot afford to be weak at sea history has shown that whichever power controls the seas has India at her mercy and India's very independence itself). १९४७ ते १९६२ ह्या काळात नौसेनेची प्रगती ही कूर्मगतीने होत होती. 'आधी विकास की आधी सुरक्षितता' या वादात सरकारने सेनादलाकडे खूप कमी प्राधान्य दिले. | १९६२ साली चीनने आक्रमण केल्यावर सरकारच्या लक्षात आले, की आपले हेतू आक्रमणाचे नसले तरी स्वतंत्र राष्ट्राच्या संरक्षणासाठी व आपल्या सीमासुरक्षेसाठी प्रबळ सेनादलांची आवश्यकता आहे. सेनादलांच्या दृष्टीने १९६२ चे चिनी आक्रमण ही इष्टापत्ती ठरली, कारण त्यानंतर लष्करी अंदाजपत्रकात घसघशीत वाढ होऊन लष्कराच्या प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या. तत्पूर्वी १९६० साली भारतीय आरमाराने गोवा मुक्तिसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावून गोवा स्वतंत्र केला. १९६२ च्या चिनी आक्रमणात आरमाराला विशेष कामगिरी बजावता आली नाही; कारण हे युद्ध हिमालयाच्या कुशीतच लढले गेले. । १९६५ च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात मात्र आरमाराने पश्चिम व पूर्व समुद्रकिना-यांचे संरक्षण केले. ह्या युद्धात पाकिस्तानने द्वारका बंदरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण तो हाणून पाडण्यात आला. हे युद्धसुद्धा पश्चिम रणभूमीवरच लढले गेल्यामुळे आरमाराची कामगिरी ही मर्यादित होती. वरील दोन युद्धांच्या समाप्तीनंतर व पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या अकाली निधनानंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या इंदिरा गांधींनी राष्ट्राची धुरा सांभाळताच भूसेना, नौसेना व वायुसेनेची दस्तुरखुद्द पाहाणी करून सेनापतींशी उत्साहवर्धक चर्चा करून भारतीय सैन्यात चैतन्याचे वारे आणले. आरमारावर तर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांनी अॅडमिरल ए.के. चटर्जी, करसटजी, गांधी, परेरा, नंदा, कृष्णन, नाडकर्णी, मनोहर आवटी ह्या वरिष्ठ नौसेना अधिका-यांशी वैयक्तिक संपर्क साधून आरमाराच्या समस्या व अडचणी ह्यांचा सखोल अभ्यास करत नाविकांच्या प्रशिक्षणावर भर देण्यास सुरुवात केली. रशियाशी नाविक करार करून अत्याधुनिक जहाजे विकत घेतली. पाणबुड्या व मिसाइल क्रूझर्स भारताच्या जंगी बेड्यात सामील झाल्या. रशियन पेटीया क्लास आय.एन.एस. कमोर्टा, कदमत, आंद्रोथ इत्यादी जहाजे, आय.एन.एस. खंदेरी, क्रूरसुरा, वागीर ह्या शिल्पकार चरित्रकोश ३९९