पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| सन १६१२ साली हत्यारबंद जहाजांचा काफिला इंग्लंडहून पोर्तुगिजांना हरवून सुरतेच्या किना-यावर पाहाचला. १६१५ साली फिरंग्यांनी जहांगिराकडून व्यापारी दळणवळणाची शासकीय परवानगी मिळवली. कावेबाज ब्रिटिशांनी मुगल दरबाराला बंदुका, तोफा, दर्बिणी व सोन्याचांदीच्या उंची वस्तूंची भेट देत, नजराणा पेश करत वश करून सुरत, अहमदाबाद, कॅम्बे येथे व्यापारी वखारी उघडून भारतास लुटण्यास सुरुवात केली. ह्या काळात म्हणजे १६४९ ते १७३० सालापर्यंत ब्रिटिशांचा प्रतिकार केला तो फक्त मराठा आरमाराने. मराठ्यांच्या पराक्रमी आरमाराची योजनाबद्ध उभारणी शिवाजी महाराजांनी केली म्हणून छत्रपती शिवाजीराजांना ‘भारतीय आधुनिक नौदलाचे आद्य प्रणेते' मानण्यात आले असून आय.एन.एस. शिवाजी व आंग्रे ह्या नावाची भारतीय नौसेनेची प्रशिक्षण केंद्रे सध्या कार्यरत आहेत. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी १६१३ साली इंग्लंडने इंडियन मरीन्सची स्थापना करून डच, फ्रेंच, पोर्तुगीज व मराठा आरमाराबरोबर सागरी युद्धे लढून एक तर त्यांना प्रतिबंध घातला किंवा नेस्तनाबूत तरी करून टाकले. १७३५ साली ब्रिटिशांनी मुंबई बंदरात एक डॉकयार्ड बांधून जहाजनिर्मितीस सुरुवात केली. त्याच गोदीला आता नेव्हल डॉकयार्ड म्हटले जाते. ह्याच नेव्हल डॉकयार्डमध्ये १७९५ साली एच.एम.एस. हिंदोस्थान (हर मॅजेस्टिज शिप हिंदुस्थान), १८०० साली एच.एम.एस. कॉर्नवॉलीस, एच.एम.एस. कॅमल यांची बांधणी केली. १९ आक्टोबर १८१७ साली मुंबई गोदीत बांधण्यात आलेली एच.एम.एस. त्रिंकोमाली ही सध्या पाण्यावर तरंगणारी सर्वांत जुनी युद्धनौका होय. मराठ्यांच्या आरमाराने कुलाबा (रायगड) येथे १६५० च्या दरम्यान सुरू केलेला जहाजबांधणीचा हा व्यवसाय अव्याहतपणे चालू आहे. मुंबई, कोचीन, गोवा, विशाखापट्टणम, कलकत्ता गोदीतून जहाजबांधणी जोरात चालू असून आपण तिस-या जगाला (थर्ड वर्ल्ड) युद्धनौका विकून परकीय चलन मिळवत आहोत. १७८२ साली इंडियन मरीनचे नामकरण 'द रॉयल इंडियन मरीन' असे करण्यात येऊन ब्रिटिश नौसेना अधिका-यांच्या हाताखाली भारतीय नौसैनिकांची, विशेषत: दर्याबहाद्दर कोकणी माणसांची भरती करण्यात आली. ह्या 'रॉयल इंडियन मरीन'ने पहिल्या महायुद्धात पराक्रम गाजवला. युद्ध संपल्यावर आर्थिक चणचणीचे कारण सांगून ह्या आरमारातील बहुसंख्य भारतीयांना निवृत्त करण्यात आले. त्यानंतर राणीच्या आदेशाने हे आरमार पूर्णतया 'रॉयल नेव्ही'च्या म्हणजे ब्रिटिशांच्या अखत्यारीखाली देण्यात आले. १९३० साली ह्या आरमाराचे ‘रॉयल इंडियन नेव्ही' असे परत नामकरण होऊन भारतीयांना ह्या आरमारात अधिकारी म्हणून (किंग्ज कमिशन) नेमण्यास मान्यता मिळाली. सब लेफ्टनंट डी.एन. मुखर्जी निवड होऊन त्यांना पहिला भारतीय किंग्ज कमिशन प्राप्त नौसेना अधिकारी पदाचा मान प्राप्त झाला, | १९३५ साली रॉयल इंडियन नेव्हीला ‘किंग्ज कलर'चा बहुमान बहाल करण्यात येऊन ब्रिटिश अधिका-यांच्याप्रमाणे अनेक भारतीयांनाही शौर्यपदके जाहीर झाली. ह्याच सुमारास दुस-या महायुद्धाच्या नौबती झडू लागल्या. १९३९ मध्ये ह्या 'रॉयल इंडियन नेव्ही'कडे फक्त आठ जंगी नौका (वॉरशिप्स) होत्या. १९४५ साली दुसरे महायुद्ध संपले तेव्हा हीच संख्या ११७ युद्धनौका व ३०,००० कर्मचारी इतकी झाली. दस-या महायुद्धानंतर आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या ब्रिटिश सरकारने आरमारात नोकरकपात करून ११७ पैकी ३२ युद्धनौका व ११,००० नाविक कर्मचारी एवढीच संख्या ठेवली. रॉयल इंडियन नेव्हीचे सेनापति पद रिअर अॅडमिरल जॉन व्यालनॉट सेव्हिकमॅक हॉल ह्या अधिका-यास देण्यात आले. मुंबई हे मुख्यालय म्हणून । निवडण्यात आले असले तरी आदेश मात्र लंडनहूनच देण्यात येत असत. १९४७ साली जरी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तरी कॉमनवेल्थचे सभासदत्व स्वीकारल्यामुळे व २६ जानेवारी १९५० पर्यंत गव्हर्नर जनरल हाच सरकारचा प्रमुख असल्यामुळे 'प्रजासत्ताक भारत' जाहीर झाल्यावरच शिल्पकार चरित्रकोश ३९७