पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ताडेल कार्यरत असत. पाल व शिरब ही जहाजे ३० ते ५० टन वजनांची असून त्यांवर तीन-तीन ध्वजदंड संकेत (कम्युनिकेशनल फ्लॅग मास्ट) असत. ह्या जहाजांच्या भिंतींना भोके पाडून (पोर्ट होल्स) त्यावर उखळी तोफा बसवलेल्या असत. किनारपट्टीच्या गस्ती (पॅट्रोलिंग) बरोबरच व्यापारी नौका व मच्छीमारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ह्या जवानांवर असे. या आरमारातील जंगी बेडा (फ्लीट) या संज्ञेस पात्र ठरणारी नौका म्हणजे 'गुराब' होय. ह्या नौकेवर स्वार होऊन सरखेल दर्यासारंग (अॅडमिरल) हा युद्धाची मोहीम आखून बेड्याचे (फ्लीटचे) नेतृत्व करत असे. गोड्या पाण्याच्या साठवणीसाठी या जहाजांच्या भिंतींवर मोठमोठ्या पखाली व लाकडी पिंपे ठेवलेली असत. 'गुराब' ही तत्कालीन ध्वजनौकाच, या जहाजांवर १००-१५० खलाशी २० ताडलांच्या हाताखाली कार्यरत असत. ह्या जहाजावर दारूगोळा ठेवण्यासाठी भांडारे असत. ह्या मजबूत, टिकाऊ व मर्मभेदी अशा एका जहाजांच्या बांधणीचा तत्कालीन खर्च २५ ते ३० हजार होन (शिवकालीन नाणे) इतका होता. १६७४ साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी ईस्ट इंडिया कंपनीने हेन्री ऑझ्कीडन नावाचा प्रतिनिधी महाराजांच्या दरबारात पाठवला होता. तो धूर्त व चतुर इंग्रज उंची नजराणा पेश करून सागरी सवलती मागत होता. तेव्हा महाराजांनी नजराणा स्वीकारून फिरंगी जहाजांनी कोकण समुद्रकिना-यापासून ३० सागरी मैलांच्या बाहेरूनच ये-जा करावी व स्थानीय व्यापारी नौका व मच्छीमारांना धक्का न लावता जलपर्यटन करावे अशी सक्त ताकीद दिली होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा पोर्तुगीज वकीलाने सालाझार ह्या आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे, की मराठ्यांचे आरमार हे दोन विभागांत विभागलेले आहे. एक किना-यालगत गस्त घालणारे ज्यात ३५०/४०० मचवा, नावा, होड्या असून, दुसरे ७४ जंगी बेड्यांचे (वॉरशिप्स) आक्रमक आरमार आहे. या आरमारावर सालीना दहा लक्ष मोहरा इतका खर्च होतो. ह्या आरमारात आंग्रे जातीच्या प्रमुख नेतृत्वाखाली वारली, कातकरी, भंडारी, रोहिला, हबशी, चाऊस जमातीची माणसे काम करतात. हे पत्र मराठ्यांच्या आरमारावर प्रकाश टाकणारा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज आहे. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, अंजनवेल, रत्नदुर्ग ह्या जलदुर्गांवर १०/१० टनांच्या तोफा कशा काय चढवण्यात आल्या हे एक कोडेच आहे. कुलाबा प्रांतात (आताचा रायगड जिल्हा) जहाजबांधणीचा कारखाना शिवाजी महाराजांनी सुरू करून भारतीय जहाजबांधणी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. कुलाबा हा शब्दच फार्सी असून कुल+अब म्हणजे 'गोदी' (डॉकयार्ड) असा त्याचा अर्थ आहे. ह्या तत्कालीन कुलाबा प्रांतातच आंग्रे ह्यांची जहागीर-मनसबदारी होती. रत्नदुर्ग (रत्नागिरी) या सागरी किल्ल्याच्या दक्षिण अंगाला एक भुयार उत्खननात सापडले. तेव्हा असे लक्षात आले की, तो एक तरता तराफा (फ्लोटिंग डेक) होता, की ज्यावर जायबंदी जहाजांची दुरुस्ती होऊन ती परत युद्धमोहिमेवर रवाना होत असत. | मराठ्यांच्या ह्या आरमारात खानगी-सारंग-तांडेल-दर्यासारंग-दर्याधुरंधर-दर्यादिलेर व सरखेल (अॅडमिरल) असे चढत्या क्रमाचे हुद्दे होते. पहिल्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर आंग्रे व पेशवे ह्यांचे वाद होऊन कान्होजींच्या मृत्यूनंतर म्हणजे १७२९ साली मराठ्यांचे आरमार दुबळे झाले आणि फिरंग्यांच्या आरमाराचा वरचष्मा निर्माण झाला. मराठा आरमाराच्या पतनानंतर कोकण किना-यावर ब्रिटिश सत्ता शिरजोर झाली. मोगल बादशहा जहांगिराच्या हुकमाने व्यापाराच्या नावावर मिळालेल्या परवानगीचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी सुरतेत ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय उभारून संपूर्ण भारतीय किना-यावर सुरतेपासून कलकत्त्यापर्यंत ‘रॉयल नेव्ही'ची सत्ता स्थापन केली. १८५७ चे स्वातंत्र्यसमर ब्रिटिशांनी आपल्या धूर्त कारस्थानी डावपेचांनी मोडून काढत तैनाती फौज व आरमाराच्या सहाय्याने भारतातील आपली सत्ता पुन्हा स्थिरस्थावर केली. ३९६ शिल्पकार चरित्रकोश