पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परकीय शत्रूपासून आपल्या सीमांचे रक्षण, देशातील हिंसक फुटीरतावादी चळवळींना तोंड देणे, हाताबाहेर जात असलेल्या स्थितीशी मुकाबला करण्यास जेव्हा नागरी सेवांना अपयश येते, तेव्हा अपवादात्मक स्थितीत केलेला हस्तक्षेप, नैसर्गिक व अन्य आपत्तींच्या वेळी केलेले साहाय्य, भारताच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याकरिता श्रीलंकेसारख्या देशात जाऊन केलेले कार्य व संयुक्त राष्ट्र संघटना (युनो) सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिलेली अन्य देशांतील जबाबदारी पार पाडणे अशी अनेक कामे भारतीय लष्कराने केलेली आहेत. | भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय राज्यकर्त्यांना जगातील अन्य प्रमुख देशांतील नेत्यांना जशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची लष्करी पार्श्वभूमी होती, तशी भारतीय नेत्यांना नव्हती. त्यामुळे भारताच्या राजकीय नेतृत्वाला लष्करी तयारीची आवश्यकता कळायला चीनपुढे १९६२ साली दारुण पराभव पत्करावा लागला. परंतु त्यानंतर मात्र लष्करी तयारीच्या बाबत राज्यकर्त्यांनी सैन्यदलाला भरपूर पाठिंबा दिला व त्याचा सकारात्मक परिणाम पुढील सर्व युद्धांवर दिसून आला. | दोन महायुद्धे, १९४७-१९४८, १९६५, १९७१ व सियाचेन, कारगिल अशी पाकिस्तानबरोबर झालेली युद्धे, १९६२ चे चीन युद्ध, पूर्वांचलातील सशस्त्र बंडाळी, काश्मीर व भिंद्रनवाले यांच्या विरोधातील कारवाई यांतून १९६२ च्या चीन युद्धाचा अपवाद वगळता भारतीय लष्कराने त्याच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला असून हिंसात्मक मार्गाने भारताच्या सार्वभौमत्वाला व अखंडतेला धोका पोहोचविणे कोणत्याही शक्तीला शक्य नाही याची खात्री आजवरच्या इतिहासाने दिली आहे. भूसेना, वायुसेना व नौसेना अशी भारतीय लष्कराची तीन प्रमुख अंगे आहेत. तसेच सीमासुरक्षा दल आदी निमलष्करी दले आहेत, त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणाही देशाच्या सुरक्षेचे काम करीत असतात. या सर्वांच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा प्रस्तावनेत घेतला आहे. | या खंडासाठी चरित्रनायक म्हणून निवडताना आम्ही पुढील निकष आमच्यासमोर ठेवले होते. महाराष्ट्र ही जन्मभूमी हा पहिला महत्त्वाचा निकष आमच्यासमोर होताच. रणांगणावर शौर्य गाजवताना ज्यांना (ब्रिटिश अमदानीत) व्हिक्टोरिया क्रॉस, परमवीरचक्र, महावीरचक्र, परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, अशोकचक्र, किर्तीचक्र, शौर्यचक्र ही पदके मिळालीत, त्यांच्या नावांचा चरित्रनायक म्हणून विचार करण्यात आला. तसेच संरक्षण दलात अतिशय उच्च पदावर असणा-या व्यक्तींचीही चरित्रनायक म्हणून निवड करण्यात आली. यात भूसेनेच्या दृष्टीने जनरल व लेफ्टनंट जनरल, नौसेनेच्या दृष्टीने अॅडमिरल व व्हाइस अॅडमिरल आणि वायुसेनेच्या दृष्टीने एअर चीफ मार्शल व एअर मार्शल या पदांवरील व्यक्तींचा चरित्रनायक म्हणून विचार करण्यात आला. याशिवाय सेनेच्या हेरखात्यातील वरिष्ठ पदांवर विशेष कामगिरी बजावणा-या व्यक्ती, संरक्षण क्षेत्राशी संबंधित लेखक व पत्रकार, तज्ज्ञ, विश्लेषक व्यक्ती, निमलष्करी दलात वरिष्ठ पदांवर अथवा विशेष कामगिरी बजावणाच्या व्यक्ती यांचाही समावेश चरित्रनायकांत केलेला आहे. तसेच संरक्षणाशी संबंधित संशोधन करणाच्या व सैन्यदलाला प्रोत्साहन देणा-या संस्था व संस्थाचालक, तीन व त्यांपेक्षा जास्त पिढ्या लष्करात असणा-या कुटुंबांविषयी माहितीसुद्धा या खंडाच्या परिशिष्टांत दिलेली आहे. या सर्व चरित्रनायकांची माहिती मिळविणे हे फार मोठे कष्टाचे व जिकिरीचे काम होते. परंतु शशिकांत मेहंदळे, निवृत्त कमांडर अनिल आठल्ये, शरद रानडे, भगतसिंग देशमुख, डॉ. अरविंद परांजपे, प्रसाद कुलकर्णी | व कर्नल तांबेकर यांनी चरित्रनायकांची नावे निवडणे व त्यांची माहिती संकलन करणे या कामांत उत्स्फूर्त सहकार्य केले आणि अविनाश पंडित यांनी नोंदी तपासणे, अनुवाद करणे आदी संपादकीय कामांतही मोठे सहकार्य केले. या सहृदांच्या साहाय्यामुळे हे महत्कार्य शक्य झाले. त्यांचे ऋण शब्दांत मांडणे कठीण आहे. ३८८ शिल्पकार चरित्रकोश