पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील दोनशे वर्षांच्या कालखंडातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देणाच्या चरित्रकोश प्रकल्पाची संकल्पना 'विवेक ने मांडली. त्यांतील ‘संरक्षण खंड' आपल्या हाती देत असताना आम्हांला आनंद होत आहे. या प्रकल्पासाठी विवेकने गेल्या दोनशे वर्षांचा कालखंड निवडला याचे कारण, आज जे आधुनिक संस्थाजीवनाचे आपण रूप पाहत आहोत, त्याचा संकल्पनात्मक आधार व त्यातील संस्थात्मक आशय गेल्या दोनशे वर्षांतच भरला गेला आहे. संरक्षण क्षेत्राचीही कथा यापेक्षा वेगळी नाही. | आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे व प्रादेशिक अखंडतेचे संरक्षण करण्यास सिद्ध असलेले संरक्षक दल हे आधुनिक राष्ट्रजीवनाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. राष्ट्राचे अस्तित्वच या घटकाच्या सक्षमतेवर, कार्यक्षमतेवर आणि सैन्यदलाची राष्ट्रभक्ती, शौर्य व नीतिधैर्यावर अवलंबून असते. | एक काळ असा होता, की सैन्यदलाचा राजकीय निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग असे. परंतु आधुनिक राष्ट्र संकल्पनेत दैनंदिन राजकीय निर्णय प्रक्रियेतील सैन्यदलाचा सहभाग समाप्त करण्यात आला. नागरी प्रशासन जे राजकीय निर्णय घेईल त्यांची अंमलबजावणी करणे, हे लष्कराचे काम राहिले. ब्रिटिशांकडून ही परंपरा भारतीय शासनप्रणालीत आली. भारताने ती टिकवून ठेवली ही महत्त्वाची बाब म्हटली पाहिजे. कारण पाकिस्तानी व भारतीय लष्कराला एकच वारसा मिळाला असला, तरी पाकिस्तानला ती परंपरा टिकविता आली नाही. | हा आधुनिक दृष्टिकोन व आज असलेली सैन्यदलाची आधुनिक रचना ही आपल्याला ब्रिटिशांनी दिलेली देणगी असली व जरी भारताच्या लष्कराचा स्वातंत्र्यपूर्व काळातला इतिहास हा ब्रिटिश साम्राज्याकरिता लढला गेलेला इतिहास असला, तरी पहिल्या व दुस-या महायुद्धामुळे भारतीय लष्कराचा विकास झाला, भारतीय लष्करामध्येही आपण ब्रिटिशांच्या खांगला खांदा लावून तेवढ्याच शौर्याने लढू शकतो असा आत्मविश्वास आला. या महायुद्धांमुळे जगाचे व्यापक भान आलेल्या व स्वातंत्र्याची जाणीव झालेल्या सैन्यबळाच्या आधारावर यापुढे आपल्याला भारताला पारतंत्र्यात डांबून ठेवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. | महाराष्ट्राच्या परिवर्तनाला हातभार लावलेल्या महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांचा परिचय असे या प्रकल्पाचे स्वरूप असले तरी या खंडापुरते त्याचे स्वरूप बदललेले आहे. कारण लष्कराची संकल्पना ही अखिल भारतीय असल्याने भारतीय लष्करी क्षेत्रात महाराष्ट्रातील ज्या महत्त्वपूर्ण व्यक्तींचा सहभाग राहिला, त्यांची ओळख या खंडातून करून देण्याचे आम्ही निश्चित केले. भारताच्या आधुनिक संरक्षण क्षेत्राच्या जडणघडणीत महाराष्ट्राचाही महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. एक तर मोगल काळातच शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने अखिल भारतीय स्वातंत्र्याचे स्वप्न महाराष्ट्राने पाहिले होते. मराठी सैनिक देशाच्या सर्व भागांत जाऊन लढले होते. तो महाराष्ट्र राज्याचा वारसा आधुनिक काळातही कायम राहिला आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने त्या वारशाची ओळख करून दिली जाणार आहे. शिल्पकार चरित्रकोश ३८७