पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिरेमठ, शांतवीरय्या गदिगेया प्रशासन खंड हिरेमठ, शांतवीरय्या गदिगेया मेकॅनिकल इंजिनीअर, व्यवस्थापक व प्रशासक १२ डिसेंबर १९१३ - २३ फेब्रुवारी १९९७ शांतवीरय्या गदिगेया हिरेमठ यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र त्यांच्या डोक्यावरून हरपले होत,े त्यामुळे हिरेमठ यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. लहानपणापासून स्वावलंबी जीवन जगत, त्यांनी कष्ट करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ते फर्गसन महाविद्यालयामधून शासकीय इंजिनीअरींग कॉलेजमध्ये गेले. त्यांनी १९३७ साली मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी द्वितीय श्रेणीत प्राप्त केली. १९३८ साली राज्याच्या मेकॅनिकल विभागाची सुरुवात झाली, त्याचे हिरेमठ हे खर्‍या अर्थाने संस्थापक ठरले. ही संघटना त्यांनी अगदी छोट्या उपविभागापासून बांधून महाराष्ट्रभर फैलावली. याच विभागाने पुढे महाराष्ट्र राज्यात अनेक विकासाची कामे केली.

नाशिक जवळील गंगापूर हे देशातील पहिले मातीचे धरण त्यांनी अवजड यंत्रसामग्री वापरून व स्थानिक अर्धशिक्षित तरुणांना हाताशी घेऊन पूर्ण केले. यानंतर लगेच त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती करून कोयना जलविद्युत प्रकल्पात अवजल भुयार खोदण्याची जबाबदारी  शासनाने त्यांच्यावर सोपविली. हेही आव्हान त्यांनी स्वीकारून पाच वर्षात शासनाच्या विभागातर्फे या भुयाराचे काम कमी खर्चात करून शासनाचा आर्थिक फायदा करून दाखविला. कोयना प्रकल्पातील कामामुळे ते भारतभर प्रकाशझोतात आले. अशी यांत्रिकी संघटना विकसित केल्याबद्दल इतर राज्यांनी त्यांचे कौतुक करून त्यांचे मार्गदर्शन स्वीकारले. 

यानंतर १९५९ साली त्यांना यांत्रिकी मंडळ स्थापन करण्यास सरकारने पाचारण करून त्याची धुरा अधीक्षक अभियंता म्हणून त्यांच्या स्वाधीन केली. या यांत्रिकी मंडळाचे मुख्यालय पुण्यात होते. हिरेमठांनी त्यांच्या प्रशासकीय कुशलतेने महाराष्ट्र राज्यभर यंत्रणेचे जाळे फैलावले. दापोडी येथील शासकीय कर्मशाळेचा विकास मोठ्या प्रमाणात करून राज्यभर धरणासाठी लागणारे पोलादी दरवाजे व पोलादी वक्राकार झडपा तयार करण्याची सुसज्ज यंत्रणा व त्याबरोबरच तंत्रज्ञ तयार केले. अशा कर्मशाळा नांदेड व अकोले या ठिकाणीही बांधण्यात आल्या व त्या त्या विभागातील मशिनरींच्या दुरुस्तीचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले. यांत्रिकी मंडळाचा विस्तार १९५९ ते १९६६ या सात वर्षात मोठ्या झपाट्याने झाला व कर्मचारी व तंत्रज्ञ यांची संख्या ३५०० पर्यंत पोहोचली. राज्यातील सर्व मातीची धरणे उदा., वीर (जिल्हा पुणे) मुळा, घोड, सिद्धेश्वर, येलदरी इत्यादी धरणे, बांधण्याचे काम अवजड यंत्रसामग्री वापरून यांत्रिकी मंडळाने करून दाखविली. मातीची धरणे, कोयना प्रकल्पातील अवजल भुयाराचे काम व राज्यातील धरणांसाठी बनविलेली पोलादी द्वारे व रेडियल गेटस ही हिरेमठ यांच्या जीवनातील सर्वोच्च ३६८ शिल्पकार चरित्रकोश