पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड सोमण, दत्रात्रेय शंकर पदे निर्माण केली गेली होती. त्यांपैकी एका पदावर सोमण यांची नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी तेरा महिने काम केले, तेथून त्यांची नेमणूक बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त या पदी करण्यात आली.या कार्यकालात त्यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात काम केले, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या साधनसामग्रीची देखभाल करणार्‍या केंद्रांमध्ये सुसूत्रता निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम सोमण यांनी केले. या पदावर त्यांनी सव्वादोन वर्षे काम केले.

१९८५ ते १९८७ या काळात सोमण मुंबईचे पोलीस आयुक्त या पदावर होते.१९८४-१९८५ मध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बँकलुटीच्या घटना घडल्या. अशा एकूण नऊ केसेसपैकी सात केसेसचा तपास सोमण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पूर्ण झाला.१९८५ मध्ये  दत्तात्रेय सोमण हे मुंबईचे पोलीस आयुक्त या पदावर असताना महत्त्वपूर्ण घटना घडली. कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून कुप्रसिद्ध असलेला चार्ल्स शोभराज दिल्ली येथील तिहार कारागृहातून आपल्या साथीदारांसह पसार झाला. सूर्यकांत जोग त्या वेळी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते. चार्ल्स शोभराजला पूर्वी अटक करणारे पोलीस अधिकारी झेंडे, सूर्यकांत जोग, आणि दत्तात्रय सोमण यांच्या सहकार्याने त्याला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला.एक अप्रतिम तपास कसा असू शकतो याचे हे एक उत्तम उदाहरण मानले जाते. चार्ल्स शोभराजला गोवा येथील एल पेकेव्हा या हॉटेलमधून अटक करण्यात आली. या केसची सर्व वृत्तपत्रांनी प्रशंसा केली आणि मुंबई पोलीस हे स्कॉटलंड पोलीस पथकानंतर जगातले दुसर्‍या क्रमांकाचे पोलीस दल आहे असा मुंबई पोलिसांचा गौरव केला. त्या वेळी सोमण म्हणाले होते की, ‘आमची तुलना कोणाशी करू नका. आम्ही जगात पहिल्या क्रमांकाचे पोलीस दल आहोत.’

१९८५ साली राष्ट्रपती पोलीस पदक देऊन दत्तात्रेय सोमण यांचा गौरव करण्यात आला. ज्यूलिओ रिबेरो यांनी पोलीस महासंचालक म्हणून केलेल्या नेत्रदीपक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक म्हणून १९८८ मध्ये दत्तात्रेय सोमण हे महाराष्ट्र राज्याचे तिसरेे पोलीस महासंचालक झाले. त्यांची कारकीर्दही रिबेरो यांच्यासारखीच चमकदार ठरली. या पदावर दहा महिने काम करून ३१ मे १९८८ रोजी ते निवृत्त झाले. संपूर्ण कारकिर्दीत त्यांना ज्या ज्या पदांवर नियुक्ती मिळाली, त्या पदावर त्यांनी मनापासून आणि आनंदाने काम केले. निवृत्तीनंतर ते मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. निवृत्तीनंतरही विविध सामाजिक प्रकल्पांमध्ये /उपक्रमांमध्ये ते कार्यरत आहेत. मफतलाल मिल,फोर्स कंपनी यांचे डायरेक्टर म्हणून ते काम पाहत होते. सध्या ते मुंबई येथील श्रद्धानंद महिला आश्रमाचे ट्रस्टी आहेत, तसेच ब्रीच कॅण्डी या हॉस्पिटलाचे विश्वस्त ही जबाबदारीही ते पार पाडत आहेत. ‘संगीत महाभारती’ या संस्थेचे देखील ते ट्रस्टी आहेत. रुबी मिल या कंपनीचे संचालक म्हणूनही ते काम पाहत आहेत. - संध्या लिमये

शिल्पकार चरित्रकोश ३६७