पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काणे, पांडुरंग वामन

न्यायपालिका खंड

 १९०७ मध्ये त्यांची रत्नागिरीहून मुंबईला बदली झाली.'साहित्यदर्पण' या विख्यात ग्रंथाच्या पहिल्या, दुसऱ्या व दहाव्या या परिच्छेदांची अशीच आवृत्ती त्यांनी १९१० मध्ये प्रसिद्ध केली. ( या ग्रंथाच्या नंतर चार सुधारित आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या. ) या आवृत्तीस अलंकारशास्त्राचा ऐतिहासिक आढावा घेणारी चारशेपेक्षा जास्त पृष्ठांची प्रदीर्घ प्रस्तावना होती. ही प्रस्तावना नंतर 'हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स' या स्वतंत्र पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्ध झाली. त्याच सुमारास पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामधील संस्कृतच्या सहायक प्राध्यापकाची जागा रिकामी झाली. त्या जागेवर काणे यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. परंतु सरकारने कमी गुणवत्तेच्या दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली. अत्यंत स्वाभिमानी असलेल्या काण्यांनी या अन्यायाच्या निषेधार्थ सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि वकिली करण्याचे ठरविले. १९०२ मध्ये त्यांचे एलएल.बी.चे पहिले वर्ष झाले होतेच; आता दुसरे वर्ष पूर्ण करून १९०८ मध्ये त्यांनी एलएल.बी. पदवी मिळवली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिली सुरू केली. वकिलीत त्यांचा अल्पावधीतच जम बसला. संस्कृतचा व धर्मशास्त्राचा त्यांचा गाढा व्यासंग असल्याने हिंदू कायद्यावर त्यांचे पहिल्यापासूनच प्रभुत्व होते आणि त्यातील अनेक प्रकरणे त्यांच्याकडे येत.
 काण्यांनी कित्येक वर्षे वकिली केली असली, तरी संस्कृत वाङ्मय, धर्मशास्त्र आणि एकंदरीत भारतीय विद्या (इंडॉलॉजी) या विषयांकडे त्यांचा विशेष कल पहिल्यापासूनच असल्यामुळे या क्षेत्रांत त्यांनी अखंडपणे गहन अध्ययन व चिंतन केले आणि त्याचे फलित आपल्या प्रचंड लेखनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले. मंडलिक सुवर्णपदकासाठी लिहिलेल्या अलंकारशास्त्रावरील निबंधाने या लेखनाची सुरुवात १९०५ च्या सुमारासच झाली होती. त्यानंतरच्या सुमारे सात दशकांच्या काळात अलंकारशास्त्र आणि साहित्यशास्त्र, अभिजात संस्कृत वाङ्मय, महाभारत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धर्मशास्त्र आणि पूर्वमीमांसा या विषयांवर काण्यांनी अक्षरश: अफाट लेखन केले. यातील बहुतेक लेखन इंग्रजीत असले, तरी मराठी लेखनही लक्षणीय आहे. अभिजात संस्कृत वाङ्मयातील बाणभट्टाचे 'हर्षचरित' आणि 'कादंबरी', त्याचप्रमाणे भवभूतीचे 'उत्तररामचरित' यांच्या चिकित्सक सानुवाद व सटीप आवृत्त्या त्यांनी प्रसिद्ध केल्या. साहित्यशास्त्रातील विश्वनाथाच्या
 काणे यांच्या धर्मशास्त्रावरील लेखनाची सुरुवात नीलकण्ठभट्टाच्या 'व्यवहारमयुख' या ग्रंथाची त्यांनी जी संपादित आवृत्ती काढली, तिच्यापासून झाली. ही आवृत्ती १९२६ मध्ये प्रसिद्ध झाली. (या आवृत्तीत मूळ संहिता आणि टीपांचा समावेश होता; संहितेचे इंग्रजी भाषांतर नंतर १९३० मध्ये प्रसिद्ध झाले.) त्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे, या आवृत्तीसाठी सामग्री जुळवीत असताना त्यांना असे वाटले की, अलंकारशास्त्राच्या इतिहासाप्रमाणेच धर्मशास्त्राचाही इतिहास थोडक्यात लिहिला, तर धर्मशास्त्राच्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल. परंतु या दृष्टीने अभ्यास सुरू केल्यावर दोन गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. एक म्हणजे धर्मशास्त्र हा विषय एवढा विस्तृत आणि गहन आहे की त्याच्यावर 'थोडक्यात काही लिहिणे केवळ अशक्य आहे; दुसरी म्हणजे, प्राचीन भारतीय धर्मशास्त्र म्हणजे आधुनिक काळात ज्याला न्यायशास्त्र ( ज्युरिसप्रुडन्स ) म्हणतात, तेच असल्याने तुलनात्मक न्यायशास्त्राच्या, सामाजिक संस्थांच्या आणि एकंदरीत विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासासाठी धर्मशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून मग त्यांनी स्वतंत्रपणे धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्याचे ठरविले. यातूनच यथावकाश 'हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र' हा पाच खंडांचा, सुमारे साडेसहा हजार पृष्ठांचा जगप्रसिद्ध बृहद्ग्रंथराज सिद्ध झाला.
 वस्तुत: या ग्रंथाला धर्मशास्त्राचा ज्ञानकोश म्हणणे अधिक योग्य होईल. याचा पहिला खंड १९३० मध्ये प्रसिद्ध झाला, नंतर दुसरा खंड दोन भागांत
शिल्पकार चरित्रकोश