पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न्यायपालिका खंड सभेचे निमंत्रक मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. एन. पी. नाथवानी हे होते. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सभेवर बंदी घातली. न्या. नाथवानी यांनी या बंदीविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली. न्या. कांटावाला आणि न्या. तुळजापूरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आणीबाणी लागू असल्याने व राष्ट्रपतींनी सर्व मूलभूत हक्क स्थगित केलेले असल्याने, सभाही घेता येणार नाही व न्यायालयात दादही मागता येणार नाही, असा युक्तिवाद सरकारने केला. तो पूर्णत: अमान्य करून, आणीबाणी लागू असली आणि मूलभूत हक्क स्थगित असले, तरीही सभा घेता येईल व दादही मागता येईल, असा सुस्पष्ट निर्णय न्या. कांटावाला व न्या. तुळजापूरकर यांनी दोन स्वतंत्र निकालपत्रांद्वारे देऊन, पोलीस आयुक्तांनी सभेवर घातलेली बंदी रद्द केली.
याव्यतिरिक्तही न्या. कांटावाला यांच्यासमोर अनेक महत्त्वाचे खटले आले आणि त्यात त्यांनी अचूक निर्णय दिले. जॉर्ज फर्नांडिस यांच्या निवडणुकीविरुद्ध स. का. पाटील यांनी दाखल केलेला दावा हा असा एक खटला. लंडनमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाने एका पोलिश (पोलंड देशातील) मुलीशी लग्न केले होते, त्याने घटस्फोटासाठी लावलेला दावा हा दुसरा असाच महत्त्वाचा खटला. प्रश्न किंवा वाद कोणताही असला, तरी न्या. कांटावाला त्याच्या मुळाशी जाऊन त्याची अलगद सोडवणूक करीत.

 डिसेंबर १९७६ मध्ये राज्यपाल अलीयावर जंग यांचे निधन झाले. त्यावेळी काही महिने आणि नंतर एकदा काही काळ, असे दोन वेळा न्या. कांटावाला यांनी हंगामी राज्यपाल म्हणून काम पाहिले. न्या. कांटावाला यांना गणिताप्रमाणेच भारतीय तत्त्वज्ञानाची आवड होती. संपूर्ण भगवद्गीता त्यांना मुखोद्गत होती.

शरच्चंद्र पानसे

संदर्भ : १. http://bombayhighcourt.nic.in २. बॉम्बे लॉ रिपोर्टर, १९९२. शिल्पकार चरित्रकोश काणे, पांडुरंग वामन

महामहोपाध्याय पां. वा. काणे ज्येष्ठ न्यायविद,

मुख्य नोंद

धर्मशास्त्राचे भाष्यकार १८ एप्रिल १९७२

धर्मकारण खंड
 पांडुरंग वामन काणे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र परशुराम येथे एका मध्यमवर्गीय आणि वैदिक विद्वानांच्या घराण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण दापोली येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. पहिल्या वर्षी आणि इंटरच्या वर्षी त्यांना संस्कृत विषयातील शिष्यवृत्ती मिळाली. १९०१ मध्ये ते बी. ए.ची परीक्षा प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले.

 एका वर्षानंतर म्हणजे १९०२ मध्ये पांडुरंग वामन काणे एलएल. बी. च्या पहिल्या वर्षाची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. नंतरच्या वर्षी म्हणजे १९०३ मध्ये ते संस्कृत आणि इंग्रजी हे विषय घेऊन एम. ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना 'गोकुळजी झाला वेदान्त पारितोषिक' मिळाले. एम. ए. झाल्यावर काणे यांनी रत्नागिरीच्या सरकारी उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी स्वेच्छेने स्वीकारली. तेथे ते सात विषय शिकवीत. ही नोकरी करीत असतानाच त्यांनी मुंबई विद्यापीठाचे वि. ना. मंडलिक सुवर्णपदक दोन वेळा मिळविले. यासाठी विद्यापीठाला संस्कृतमधील एखाद्या विषयावर निबंध सादर करावे लागत. काणे यांचा एक निबंध 'हिस्टरी ऑफ अलंकार लिटरेचर' या विषयावर होता, तर दुसऱ्या निबंधाचा विषय 'आर्यन मॅनर्स अॅन्ड मॉरल्स ॲज डिपिक्टेड इन दि एपिक्स' असा होता.

३५