पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सोमण, दत्रात्रेय शंकर प्रशासन खंड इंटर आर्टस्पर्यंत सोलापूरच्या डी.ए.व्ही. महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले. पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी बी.ए. आणि एम.ए.ची पदवी घेतली. शिक्षण घेत असतानाच दत्तात्रेय सोमण यांनी नोकरीदेखील केली. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ सार्वजनिक बांधकाम खात्यात लिपिक म्हणून काम केले. बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सोमण यांनी पुणे येथील कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले, त्या वेळी ते एम.ए.चा अभ्यास करत होते. १९५३ मध्ये ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची भारतीय पोलीस सेवेमध्ये निवड झाली. ऑक्टोबर १९५३ मध्ये ते माउण्ट अबू येथील केंद्रीय पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी दाखल झाले. प्रशिक्षणानंतर दत्तात्रेय सोमण यांची प्रथम नियुक्ती त्या वेळच्या मुंबई राज्यात सुरत येथे झाली. येथे सहा महिने पोलीस खात्याची माहिती घेतल्यावर नवसारी येथे त्यांची स्वतंत्र नेमणूक साहाय्यक पोलीस अधीक्षक या पदावर करण्यात आली. ऑगस्ट १९५७ मध्ये सोमण यांची नियुक्ती परभणी जिल्ह्यात साहाय्यक पोलीस अधीक्षक (ए.सी.पी.) या पदावर करण्यात आली.तेथून ऑगस्ट महिन्यात कच्छ जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे असतानाच मुंबई राज्याचे विभाजन झाले आणि त्यांची नेमणूक महाराष्ट्र राज्यात करण्यात आली. अहमदनगर येथे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून तीन वर्षे काम केल्यावर १९६३ मध्ये मुंबई येथे पोलीस उपायुक्त या पदावर ते रुजू झाले. त्या वेळी उत्तर मुंबई या विभाग तीनची संपूर्ण जबाबदारी सोमण यांच्यावर होती. विविध पदांवर काम केल्यावर १९६७ मध्ये सोमण पोलीस उपायुक्त, विशेष शाखा या विभागाचे प्रमुख झाले. या पदावर असतानाच त्यांना भूतान येथे सरकारचा पोलीस खात्याचा सल्लागार म्हणून जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी १९७० ते १९७४ या कालावधीत काम केले. वेगळी भाषा बोलणार्‍या संपूर्ण वेगळ्या संस्कृतीच्या लोकांबरोबर काम करण्याचा एक अपूर्व अनुभव या काळात सोमण यांना मिळाला. १९७३ मध्ये सोमण यांना पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. यानंतर केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या गुप्तचर विभागात सोमण यांनी १९७४ ते १९७६ दिल्ली आणि मुंबई येथे डेप्युटी डायरेक्टर या पदावर काम केले. तेथून त्यांना पोलीस महानिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात येऊन त्यांच्यावर ‘स्टेट टे्रडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे सतर्कता सल्लागार म्हणून जबाबदारी देण्यात आली. या संघटनेकडे त्या वेळी खाद्य तेलाची निर्यात, वृत्तपत्रांची छपाई, मळी निर्मिती, साखर उद्योग अशा विविध उद्योगांची मक्तेदारी होती.या संघटनेचे काम नियमांनुसार होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी सोमण यांनी पार पाडली. या व्यापारी संघटनेमध्ये काम करत असताना युरोपमधील काही देश तसेच अमेरिका आणि रशिया या देशांना त्यांनी भेटी दिल्या. १९८२ मध्ये दत्तात्रेय सोमण महाराष्ट्रात परत आले.त्या काळात पोलीस खात्यातील कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचार्‍यांच्या समस्यांवर विचार करण्यासाठी सोमण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने आपला अहवाल नियोजित वेळेत, तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण सादर केला.यानंतर सोमण यांची नेमणूक गृहखात्यात अवर सचिव म्हणून करण्यात आली.त्याच वर्षी गोवा येथे राष्ट्रकूल परिषदेचे दोन दिवसांचे अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनाचे व्यवस्थाप्रमुख म्हणून सोमण यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. १९८४ मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांची दोन शिल्पकार चरित्रकोश स ३६६