पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

A प्रशासन खंड साठे, दिनकर दत्तात्रय समजल्यावर त्यांनी मीराताईंना मोझांबिक मधील वाहतूक मंत्रालयातील ग्रंथालये नवीन तांत्रिक पद्धतीने व्यवस्थित बनवण्याची विनंती केली व मीराताईंनी ती पूर्णही केली. १९८६ मध्ये साठे पश्‍चिम आणि मध्य रेल्वेचे अतिरीक्त महाप्रबंधक म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर साठे पुण्यातच स्थायिक झालेले आहेत. ते कविता, कथा असे लिखाण करतात. वेगवेगळ्या दिवाळी अंकांतून त्यांच्या कथाही प्रकाशित झाल्या आहेत. - दत्ता कानवटे

साठे, दिनकर दत्तात्रय मुख्य सचिव-महाराष्ट्र राज्य २३ सप्टेंबर १९१७ - १९ डिसेंबर१९९९ दिनकर दत्तात्रय साठे यांचा जन्म एका उच्चभ्रू कुटुंबात पूर्वीच्या इंदूर राज्यातील मंडलेश्वर या गावी झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मालघर हे आहे. त्यांचे वडील दत्तात्रय लक्ष्मण साठे भारतीय वनसेवेत कार्यरत होते. त्यांचे एक काका सिव्हिल सर्जन तर दुसरे काका जगन्नाथ साठे हे आय.सी.एस. होते. आई चारुमती या पुण्यात एक कर्तृत्ववान समाजसेविका म्हणून ओळखल्या जात. त्या अनेक वर्षे पुणे वुमन काउन्सिल मध्ये कार्यरत होत्या. आई आणि वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा दिनकर साठे यांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा होता. साठे यांचे शालेय शिक्षण बंगळुर येथे झाले. इंदूरच्या होळकर महाविद्यालयातून त्यांनी पहिल्या वर्गात बी.ए. पूर्ण केले तर सेंट जान्स कॉलेज, केंब्रिजमधून त्यांनी एम.ए. (काँटॅब) ची पदवी संपादन केली. १९४१ मध्ये त्यांची निवड भारतीय प्रशासकीय सेवेत झाली. डेहराडून मधील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मद्रास कॅडरमधील कुंदापूर येथे उप जिल्हाधिकारी या पदावर त्यांची पहिली नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते महामार्ग विकास महामंडळाचे (सी.आर.टी.बी.) केंद्रीय सचिव म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी मद्रास राज्यातील खासगी वाहतुकीच्या राष्ट्रीयीकरणाची योजना तयार करून ती एका वर्षाच्या कालावधीत यशस्वीपणे कार्यान्वित केली. यावेळी द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी या योजनेचे यश पाहून मुंबई राज्यामध्ये खाजगी वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण करण्याची योजना राबवण्यासाठी साठे यांना मुंबई येथे बोलावून घेतले. १९४७ ते १९५३ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात रस्ते वाहतूक योजना कौशल्याने राबवली. १९५२ मध्ये तेव्हाच्या मुंबई राज्यातील खाजगी वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि राज्य परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली. यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. महाराष्ट्रातील खेडोपाडी राज्यपरिवहन महामंडळाच्या गाड्या पोहोचाव्यात यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. राज्यपरिवहन महामंडळाचा विस्तार महाराष्ट्रात सर्वत्र होण्याचे श्रेय साठे यांच्या प्रयत्नांनाच आहे. (१९५३ ते ५६) भाषावार प्रांत रचनेनंतर अहमदाबाद या प्रांताची विभागणी करण्यात आली आणि १९५६ ते ५८ या कालावधीत त्यांची अहमदाबादचे विभागीय आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. १९५८ मध्ये साठे यांची नेमणूक मुंबई राज्याचे सचिव-कृषी आणि नागरीपुरवठा या स । शिल्पकार चरित्रकोश ३५७