पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्यनारायण, नीला पीलरसेट्टी प्रशासन खंड खात्यांमधून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. समाजकल्याण विभागात त्यांनी केलेल्या कामाची पावती आज अनेक स्वयंसेवी सेवा आणि विविध सामाजिक संस्था त्यांना देतात. मध्य रेल्वे व पश्‍चिम रेल्वे मार्गावरअपंगांसाठी सदनिका विकत घेऊन त्या अपंग संस्थांना देण्याची संकल्पना त्यांचीच. हेतू हा की, अपंगांना दक्षिण मुंबईमध्ये दूरवर प्रवास करायला लागू नये. वरळीच्या नॅबसाठी म्हणजे अंध शाळेसाठी परदेशातून वाद्ये मागवून ऑर्केस्ट्रा बनविण्यासाठी निधी देण्याची कल्पनाही त्यांचीच. आज नॅबचा ऑर्केस्ट्रा परदेशात जाऊन कार्यक्रम करतो याचा त्यांना रास्त अभिमान वाटतो. धारावीमधील उभे राहिलेले लेदरचे सेंटर हाही त्यांच्या अभिमानाचाच एक विषय आहे. प्रत्येक झोपडीमध्ये जाऊन त्यांनी तेथील लोकांना हा उद्योग मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी उद्युक्त केले होते. आज त्याचे एवढे मोठे स्वरूप झाले आहे की धारावीतील चामड्याच्या वस्तू निर्यात होतात. गृह विभागात असताना कारागृहातील महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण, स्त्रियांसाठी खुले कारागृह करणे तसेच बंदिवानांच्या मुलांसाठी योजना हाती घेणे यासारखी काही उदात्त कामे त्यांनी केली आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागात एका जपानी कंपनीबरोबर टेट्रा पॅक या विषयावर संशोधन केले. आज सर्वत्र छोट्या पॅकमधून, सॅशेमधून खाद्यपदार्थ, तेल मिळते, हे त्यांच्याच संशोधनाचे फळ आहे. त्यांच्या संशोधन निबंधाची दखल घेऊन केंद्र शासनानेही त्यांना प्रशस्तिपत्रक दिले आहे. युनायटेड नेशन्समधील एपीसीडब्लू या स्त्रियांच्या कामासाठी झटणार्‍या संस्थेने त्यांचा शोधनिबंध संदर्भ पेपर म्हणून त्यांच्या लायब्ररीमध्ये ठेवला आहे. सध्याच्या नवीन पदावर काम करताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणार्‍या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान त्यांनी सुरू केले आहे. ऑन लाईन व्होटिंगचा प्रयोग करायचीही त्यांची तयारी चालू आहे. नीला सत्यनारायण कवयत्री, संगीत दिग्दर्शक, लेखक या अनेकविध भूमिका जगतात. हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून त्यांनी १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलाला जन्म दिल्यानंतर पालकाला ज्या कटू अनुभवातून जावे लागले आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले त्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे. ज्या मातांना अशी मुले आहेत त्यांना धीर आणि सामर्थ्य देण्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरले आहे. ‘सत्यकथा’ हे त्यांचे पुस्तक उद्योजकतेबाबत आहे आणि ‘एक दिवस (जी)वनातला’ हे त्या वन विभागात सचिव असताना त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे. प्रशासनाच्या विविध खात्यातून काम करून ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून २००९ साली नीला सत्यनारायण सेवानिवृत्त झाल्या. नीला सत्यनारायण यांनी लिहिलेल्या जवळजवळ १५० गीतांचे ध्वनिमुद्रण झाले असून, त्यांनी बसविलेली वेधक नृत्ये आणि त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय झालेले आहेत. त्यांना त्यांच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल केंद्र शासनाचा अहिंदी भाषिक लेखक पुरस्कार - १९८५, महात्मा गांधी पुरस्कार - १९८६, भारत निर्माण पुरस्कार- १९८७,महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २००७, ३५४ शिल्पकार चरित्रकोश