पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्ही. श्रीनिवासन प्रशासन खंड यांची अफगाणिस्तानात नियुक्ती झाली. तेथे त्यांनी बँक-ई-सनाती-ई अफगाणिस्तानची स्थापना केली. याशिवाय त्यांनी नायजेरियात हेल्थ सिस्टिम फंडही निर्माण केला. भारतात परतल्यावर १९८१ मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य सचिव म्हणून नियुक्ती झाली. या पदाचा कार्यभार त्यांनी १९८६ पर्यंत सांभाळला. त्यानंतर श्रीनिवासन यांनी राज्यात कार्यरत असणार्‍या अशासकीय सेवाभावी संस्थांसाठी सोसायटी फॉर सर्व्हिस टू व्हॉलंटरी एजंसिज (सोस्व्हा) या संस्थेची उभारणी केली. ते स्वत: २००६ पर्यंत सोस्व्हाचे संस्थापक-मुख्य अधिकारी या पदावर कार्यरत होते. सोस्व्हाच्या कामाचा एक भाग म्हणून स्थापण्यात आलेल्या सोस्व्हा ट्रेनिंग अँड प्रमोशन इन्स्टिट्यूट च्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी भरीव योगदान दिले. औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र आघाडीवर असला तरी कारखान्यांचे जाळे फक्त मुंबई-पुण्यापुरतेच मर्यादित आहे याची जाणीव श्रीनिवासन यांना होती. त्या काळी कारखानदारीला अत्यावश्यक अशा उत्तम पायाभूत सुविधा मुंबई-पुणे विभागातच असल्याने बहुतेक सर्व उद्योजक आपल्या आस्थापनांसाठी या पट्ट्यालाच प्राधान्य देत. याचा परिणाम म्हणून राज्याचा इतर भाग औद्योगिक प्रगतीपासून वंचित राहिला. शिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई-पुण्यात जटिल नागरी समस्या उभ्या झाल्या. पुणे-मुंबई विभागात झालेल्या प्रचंड औद्योगिकीकरणामुळे रोजगारासाठी देशभरातून वाढत्या संख्येने या शहरात येणार्‍या नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा पुरवणे दिवसेंदिवस दुरापास्त होईल हे त्यांनी ओळखले होते. यावर मोठ्या उद्योगांना हव्या त्या पायाभूत सुविधा राज्याच्या मागासलेल्या भागात विकसित करणे हा एकच उपाय आहे हे त्यांच्या मनावर बिंबले होते. अशा सुविधा फक्त शासनाच्या पुढाकारानेच निर्माण करता येतात याची श्रीनिवासन यांना खात्री होती. या विचाराने श्रीनिवासन यांनी मुंबई-पुण्याला पर्याय म्हणून राज्याच्या इतर महत्त्वाच्या शहरांत उद्योगांचे भौगोलिक विकेंद्रीकरण करावे अशी कल्पना शासनापुढे मांडली. उत्तम दर्जाच्या पायाभूत सोयी, प्रस्थापित सवलतींपेक्षा नव्या आणि उद्योजकांना आकर्षित करणार्‍या आर्थिक सवलती या प्रमुख सूत्रांवर आधारित प्रोत्साहनपर योजना आखून त्यांनी ‘सिकॉम’ची स्थापना केली. सिकॉमची ही कार्यपद्धती देशातली पहिलीच अशी प्रणाली होती, की ज्यामुळे देशात औद्योगिक भांडवलाचा ओघ अविकसित भागाकडे वळला. परिणामी, राज्यातली नागपूर, औरंगाबाद, नाशिक, तारापूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे, सोलापूर आणि चंद्रपूर ही सिकॉमच्या माध्यमातून विकसित झालेली नवी शहरे आता उद्योजकांना आकर्षित करत आहेत. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी मुंबई बेटापलीकडे असलेल्या राज्याच्या मुख्य भूभागावर नवी मुंबई निर्माण करणे अत्यावश्यक आहे हे श्रीनिवासन यांनी ओळखले होते. ही कल्पना त्यांनी तत्कालीन शासनकर्त्यांना पटवून दिली आणि त्याचा परिणाम म्हणून ‘सिडको’ स्थापन झाली. सुरुवातीला खाडीवर पूल बांधून वाशी गाव मुंबईला जोडण्यात आले. सिडकोमार्फत वाशीत मुख्यत: निवासी वस्ती उभी झाली. हळूहळू नवी मुंबई थेट बेलापूरपर्यंत विस्तारली. यात औद्योगिक आस्थापनांचाही समावेश झाला आणि आज हा पूर्ण पट्टा विकसित झालेला आपण पाहत आहोत. श्रीनिवासन यांच्या दूरदर्शी धोरणामुळे सिकॉम आणि सिडको या महाराष्ट्राने उभारलेल्या दोन संस्था संपूर्ण देशासाठी आदर्श ठरल्या. सिकॉमचे यश पाहून व | ३४४ शिल्पकार चरित्रकोश