पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड व्ही. श्रीनिवासन बहुतेक सर्व राज्यांनी तशीच महामंडळे आपल्या भौगोलिक कार्यक्षेत्रात स्थापन केली. सिडकोने विकसित केलेली नवी मुंबई बघून इतर राज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात तशीच जुळी शहरे उभी करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपवण्याचा मार्ग स्वीकारला. राज्याच्या ग्रामीण विभागात कृषिविकासाला चालना मिळावी या उद्देशाने श्रीनिवासन यांनी सिकॉमची उपकंपनी महाराष्ट्र अ‍ॅग्रिकल्चर आणि फर्टिलायझर प्रमोशन कॉर्पोरेशन ‘मॅफको’ची उभारणी केली. फळ-फूल बागायत आणि कुक्कुटपालन या शेतीला पूरक अशा उत्पादकांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे काम ही उपकंपनी आजही करते आहे. चंद्रपूर हा विदर्भाचा अतिशय खनिजसमृद्ध जिल्हा आहे. इथल्या खनिज संपत्तीचे मूल्यवर्धित उत्पादनात रूपांतर करून चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र इलेक्ट्रो स्मेल्ट’ कंपनीची स्थापना झाली. या कारखान्यात कच्च्या लोखंडापासून स्पाँज आयर्नची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे स्थानिक खनिज संपत्तीचा योग्य तो उपयोग केल्याने चंद्रपूर जिल्ह्यात आज अनेक पूरक उद्योग उभे राहिले आहेत. औद्योगिक क्षेत्राबरोबरच श्रीनिवासन यांनी राज्याच्या आरोग्य विभागातही भरीव कामगिरी नोंदवली आहे. शासनाने त्यांना काही काळ अमेरिका स्थित जागतिक बँकेत प्रतिनियुक्तीवर पाठवले होते. तिथून परतल्यावर शासनाने त्यांना औद्योगिक सचिव किंवा न्हावा-शेवा पोर्ट ट्रस्ट अध्यक्ष ही पदे देऊ केली होती. श्रीनिवासन यांनी मात्र, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करण्याच्या आंतरिक इच्छेनुसार, आपणहून राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव या पदावर नियुक्ती मागितली. पाच वर्षे ते राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव होते. राज्यातल्या ग्रामीण भागांत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या आणि दर्जा यांत त्यांनी गुणात्मक बदल घडवून आणले. याच्या जोडीला कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा प्रसार करण्यावर त्यांनी भर दिला. याबाबतची खाली दिलेली आकडेवारी ही श्रीनिवासन यांनी केलेल्या कार्याचे प्रतिबिंब आहे : प्राथमिक आरोग्य केंद्रांची १९८२ मध्ये ४७७ असलेली संख्या १९८५ मध्ये १५३९ झाली. कॉटेल आणि ग्रामीण रुग्णालयांचा १९८४ मध्ये असलेला आकडा १४७ वरून १९८६ मध्ये २७७ झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आजारानंतरच्या उपचारांबरोबरच रोगप्रतिबंधक सुविधा उपलब्ध झाल्या. संसर्गजन्य रोगप्रतिबंधक लसीकरण, माता आणि बालक यांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची सुरुवात आणि त्यांचा प्रचार घडून आला. आणीबाणीमुळे थंडावलेल्या कुटुंबनियोजन मोहिमेला लोकांना स्वीकारार्ह होईल अशा पद्धतीने पुन्हा चालना दिली. केंद्र शासनाकडून कुटुंब नियोजनात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल सलग दोन वर्षे राज्याला सर्वोत्तम कामगिरीचे नामांकन मिळाले. आरोग्य क्षेत्रात काम करताना ध्येयपूर्तीसाठी श्रीनिवासन यांनी अनेक नावीन्यपूर्ण योजना अमलात आणल्या. राज्यकोषातल्या एकूण अवांतर खर्च निधीपैकी शक्य होईल तेवढा निधी त्यांनी ग्रामीण आरोग्यसेवांचा दर्जा आणि क्षमता सुधारण्यासाठी वळवला. आर्थिक अनुदानाचा वापर करण्याऐवजी परिणामकारक प्रचारमाध्यमातून कुटुंबनियोजनाबाबत जनतेची मानसिकता अनुकूल करण्यावर त्यांनी भर दिला. राज्यातल्या समाजसेवी संस्थांना एका व्यवस्थापकीय सूत्रात बांधण्यासाठी श्रीनिवासन यांच्या ‘सोस्व्हा’ या संस्थेचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. अत्यंत सुस्पष्ट विचार, समाजसेवेचा ध्यास, शास्त्रशुद्ध व्यवस्थापन तंत्र आणि नावीन्यपूर्ण योजना यांच्या आधारावर श्रीनिवासन यांनी सोस्व्हामार्फत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांना मोलाची मदत देऊन परिणामकारक मार्गदर्शन केले. व । शिल्पकार चरित्रकोश ३४५