पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिमये, शशिकांत दत्तात्रेय प्रशासन खंड कसोटी घेणारा अनुभव आला. सवाई माधोपूर येथे साहाय्यक अभियंता असताना कंत्राटदाराचे काम तपासून बिले देण्याची जबाबदारी लिमये यांच्यावर होती. एक बिल पास केल्यावर एका कॉन्ट्रॅक्टरने लिमये यांना काही रक्कम देऊ केली. परंतु लिमये यांनी आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहून ती नाकारली. यामुळे ही बातमी सर्व कॉन्ट्रॅक्टरांमध्ये पसरून पुन्हा त्यांना लाच देण्यास कोणीही धजले नाही. सरकारी सेवेत काम करताना तुम्हांला भ्रष्ट बनवण्यासाठी अनेक लोक टपलेलेे असतात; परंतु आपण आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही, उलट आपल्याबद्दलचा आदर अधिक वृद्धिंगत होतो याचे उदाहरण लिमये यांनी घालून दिले. २००१मध्ये शशिकांत लिमये वयाच्या एकावन्नाव्या वर्षी ‘मंडळ रेल्वे प्रबंधक’ ह्या पदावरून निवृत्त झाले. २००१ ते २००६ या कालावधीत त्यांनी ‘ओवन विल्यम्स’ या ब्रिटिश फर्ममध्ये लंडन-ग्लासगो रेल्वेमार्गाच्या सुधारित डिझाइनचे काम केले. २००६ पासून आतापर्यंत ते ‘स्तूप कन्सल्टंट’ या सुप्रसिद्ध इंडो- फ्रेंच कंपनीत कार्यकारी निर्देशक या पदावर कार्यरत आहेत. त्या योगे नवीन पिढीतील अभियंत्यांना त्यांच्या पुलाचे डिझाइन या क्षेत्रातील अनुभवांचा फायदा होत आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेमध्येदेखील अनेक समित्यांवर ते मार्गदर्शक म्हणून काम करत असून आपल्या ज्ञानाचा उपयोग करीत आहेत. सध्या ते एम.एम.आर.डी.ए.च्या ‘मोनोरेलसाठीच्या’ तांत्रिक सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. शशिकांत लिमये यांच्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. १९९६ मध्ये त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे ‘एस.बी.जोशी स्मृती पारितोषिक’ देण्यात आले. २००० मध्ये मुंबई आय.आय.टी.चा सन्माननीय वैशिष्ट्यपूर्ण ‘माजी विद्यार्थी पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवण्यात आले. १९९८ मध्ये कोकण रेल्वे उभारणीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना ‘कोकण रेल्वे प्रॉजेक्ट पदक’ देण्यात आले. लिमये यांना पर्यटनाची आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्याची आवड आहे. सध्या ते मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. - संध्या लिमये

शिल्पकार चरित्रकोश ३३९