पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड लिमये, शशिकांत दत्तात्रेय यांमध्ये असलेल्या सामाईक ड्रेनेजच्या आमूलाग्र सुधारणेची योजना अमलात आणली. संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्पाचा (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) ‘इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिज इंजिनिअरिंग’ या संस्थेत पुणे येथे राष्ट्रीय उपप्रकल्प निर्देशक या पदावर त्यांनी काम केले. या प्रकल्पात लिमये यांच्यासह बारा रेल्वे अभियंत्यांना अमेरिका व इंग्लंडमध्ये वर्षभरासाठी आधुनिक पूल विज्ञानावर अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यानंतरही त्यांनी पाश्चात्त्य पूल तज्ज्ञांकडून पुण्यात विविध अभ्यासक्रम राबवून घेतले. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लिमये आणि त्यांच्या गटाने अविरत कष्ट घेतले. या प्रकल्पानंतर काही वर्षांनी त्यांची कोकण रेल्वेच्या मुख्य अभियंता पदावर नेमणूक झाली. १९९० ते १९९८ या कालावधीत लिमये यांनी कोकण रेल्वेत काम केले. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व पूल, बोगदे, खडीविरहित लोहमार्ग, यार्ड्स यांचे डिझाइन शशिकांत लिमये यांच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण झाले. या वेळी ज्येष्ठ अभियंता ई. श्रीधरन यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. कोकण रेल्वेच्या ७४० कि.मी. मार्गाच्या सर्वेक्षणापासून ते पूर्णत्वापर्यंत संपूर्ण बांधकामामध्ये लिमये यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पूल अभिकल्प व बांधकामातील अनेक नवीन कल्पना सत्यात उतरण्याची संधी लिमये यांना कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये मिळाली. यांतील बर्‍याच कल्पना पुढे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, दिल्ली मेट्रो या ठिकाणी वापरण्यात आल्या. कोकण रेल्वेच्या कार्यकाळातील लिमये यांची अभिनव आणि सर्वोत्तम कामगिरी म्हणजे गोव्यातील मांडवी नदीवरील काम होय. मांडवी पुलाच्या आरेखन आणि नियोजनापासून ४०० मीटर लांबीचा अजस्त्र गर्डर ‘बार्ज माउण्टेड क्रेन’ वापरून, उचलून ‘लॉन्च’करण्यात आला. स्वत: लिमये ही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी मानतात. १९८० मध्ये लिमये पश्चिम रेल्वेचे मुख्य अभियंता या पदावर काम करत होते. त्या वेळी पावसाळ्यात कोटा व मथुरेवरील एक पूल पुरात वाहून गेला व लोहमार्ग अवरुद्ध झाला. गाडीच्या लोहमार्गावरची खडी पुराने वाहून गेल्याने कोट्याहून दिल्लीकडे जाणारी फ्रँटिअर मेल कोटा-बीना-भोपाळ मार्गावर वळवली. परंतु दुर्दैवाने ती गाडी कोटागुणा सेक्शनमध्ये अडकली. रेल्वेच्या पुढील व मागील लोहमार्गावरची खडी पुराने वाहून गेली व मार्ग खचला. अशा आणीबाणीच्या प्रसंगी लिमये यांनी तातडीने सर्व सूत्रे हाती घेतली. लिमये स्वत:, वरिष्ठ रेल्वे-पथनिरीक्षक व सात-आठ गँगमनना घेऊन मोटर ट्रॉलीने सेक्शनमध्ये गेले. लोहमार्गाखाली खडी भरून लोहमार्ग सुरळीत केला गेला. १९९८ ते १९९९ मध्ये शशिकांत लिमये द.पू. रेल्वेमध्ये कोलकाता येथे मुख्य रेल्वे पथ-अभियन्ता होते. १९९९ ते २००१ या काळात लिमये यांची नियुक्ती प. रेल्वेमध्ये अजमेर येथे ‘मंडळ रेल्वे प्रबंधक’ या पदावर झाली होती. याच वेळी त्यांच्यावर रेल्वे मंत्रालयात सहसचिव जबाबदारीदेखील होती. अजमेर शहरातील जवळजवळ २५% जमीन रेल्वेच्या अखत्यारीत आहे. अजमेर शहराच्या विकास नियोजनामधील रस्ते व सांडपाण्यासंबंधीच्या योजना अमलात आणताना अजमेरच्या जिल्हाधिकार्‍यांच्या साहाय्याने रेल्वे मंडळ प्रबंधक या नात्याने त्यांनी रेल्वेसंबंधीच्या अडचणी तातडीने दूर केल्या. आपले काम सचोटीने करणार्‍या शशिकांत लिमये यांना कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच स्वत्त्वाची शिल्पकार चरित्रकोश ३३८