पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिमये, शशिकांत दत्तात्रेय प्रशासन खंड लिमये, शशिकांत दत्तात्रेय मुख्यअभियंता-कोकणरेल्वे,मंडलरेल्वेप्रबंधक ४ ऑगस्ट १९४९ शशिकांत दत्तात्रेय लिमये यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रेय रामचंद्र लिमये हे पुण्यातील नावाजलेले सल्लागार अभियंता आणि मूल्यमापक होते. शशिकांत लिमये यांची आई कुमुदिनी या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यालयाच्या पदवीधर होत्या. शशिकांत यांच्या वडिलांना पुरातत्त्व विज्ञान, इतिहास, शिवकालीन किल्ले, योग, वास्तुशास्त्र, अध्यात्म अशा विविध विषयांचा व्यासंग होता. घरी या सर्व विषयांच्या पुस्तकांचा मोठा संग्रह होता. घरात देशभक्तीचे वातावरण होते. शाळेत असताना स्काउट आणि महाराष्ट्र मंडळ, पुणे येथील सांघिक व्यायाम प्रकार, खेळ आणि इतर उपक्रमांचा त्यांना व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये खूप फायदा झाला. लिमये यांचे शालेय शिक्षण पुणे येथील भावे प्राथमिक शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. १९६५ ते १९६७ या कालावधीत त्यांनी पुणे येथील फर्गसन महाविद्यालय आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथून बी.एस्सी. पूर्ण केले. १९७१मध्ये त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकीची (बी.ई. सिव्हिल) पदवी घेतली. या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांकात उत्तीर्ण होऊन त्यांनी ‘शारंगपाणी सुवर्णपदक’ मिळवले. १९७३ मध्ये त्यांनी मुंबई ‘आयआयटी’ मधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या विषयात एम.टेक.चे शिक्षण पूर्ण केले. भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांचे चरित्र वाचून शशिकांत यांच्या मनात अभियांत्रिकी प्रशासक बनण्याची प्रेरणा निर्माण झाली. एक कुशल अभियंता समाजाला केवढ्या सुविधा प्राप्त करून देऊ शकतो, याची जाणीव त्यांना झाली. ‘हिराकूड’ प्रकल्पाचे जनक डॉ. खोसला, ‘नदी जोड’ प्रकल्पाची कल्पना मांडणारे डॉ. के.एल. राव यांच्या कार्याने ते प्रेरित झाले. या क्षेत्रात काम करताना सामाजिक आणि विकासात्मक सुधारणा करण्याची संधी आणि त्यामुळे घडणारी देशसेवा या सर्व गोष्टींमुळे शशिकांत यांनी भारतीय अभियांत्रिकी सेवेत काम करण्याचे ठरवले. १९७३मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षेमध्ये ते संपूर्ण देशात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याच वर्षी त्यांना अमेरिकेमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी देण्यात येणारी अत्यंत मानांकित अशी ‘दोराब टाटा’ शिष्यवृत्ती मिळाली, तसेच अमेरिकेतील एका सुप्रसिद्ध विद्यापीठात प्रवेशही मिळाला. परंतु शशिकांत यांनी ही संधी ठामपणे नाकारून भारतीय रेल्वेमध्येच देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. १९७१ मध्ये पश्चिम रेल्वेमध्ये त्यांची प्रथम नियुक्ती साहाय्यक अभियंता या पदावर करण्यात आली. १९७७ ते १९७९मध्ये लिमये प. रेल्वेमध्ये सवाई माधोपूर येथे साहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते. त्या वेळी त्यांनी सवाई माधोपूर जंक्शन व बाजार

शिल्पकार चरित्रकोश