पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्युलिओ फ्रान्सिस रिबेरो प्रशासन खंड पोलिस अधिक्षक म्हणून शहरी भागात काम करण्यासाठी रिबेरो हे पुण्यात दाखल झाले. सुमारे १५ वर्षे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी काम केल्यानंतर १९६८ साली त्यांची मुंबईला नेमणूक झाली. पुणे येथील नेमणूकीच्या काळात रिबेरो यांचा भारतीय सेनेशी निरनिराळ्या कारणांनी जवळून संबंध आला. पुण्याचे पोलिस अधिक्षक म्हणून वर्षभराचे काम केल्यानंतर शहरातील पोलिस यंत्रणेचा दर्जा वाढून तो आयुक्तालय श्रेणीचा करण्याचा प्रस्ताव देण्यासाठी त्यांना पोलिस महानिरीक्षकांनी सांगितले. पुढे हा प्रस्ताव स्वीकारण्यात येऊन १ जून १९६५ रोजी पुण्याचे पोलिस आयुक्तालय अस्तित्वात आले. ऑक्टोबर १९६८ मध्ये अखिल भारतीय संमेलन झाले. त्यावेळी शिबिराचे आयोजन करण्याची जबाबदारी रिबेरो यांचेकडे सोपविण्यात आली होती. ते संमेलन झाल्यानंतर त्यांना मुंबईतील आपल्या नव्या पदावर रूजू होता आले. मुंबईत ४ वर्षे काम केल्यानंतर रिबेरो यांची हैद्राबाद येथे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून नेमणूक झाली. केंद्रीय राखीव पोलिस दलात २ वर्षे काम केल्यानंतर ते १९८२ मध्ये पुन्हा मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्त झाले. मुंबईतील नेमणूकींच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखताना राजकीय पक्ष व कामगार नेते यांच्याशी कठोरपणे वागणेही भाग पडले. त्याचप्रमाणे टोळीयुद्धाचाही बंदोबस्त त्यांना करावा लागला. महिलांसाठी त्यांनी स्वतंत्र कक्ष उभारला. कठोर पावले उचलून विद्यार्थ्यांमध्ये पसरणार्‍या अंमली पदार्थांच्या व्यसनालाही आळा घातला. १९८५ मध्ये त्यांनी मुंबईतील पदाची सूत्रे खाली ठेवली. नंतर केंद्रीय राखीव पोलिसदलाचे महासंचालक म्हणून रिबेरो यांची नियुक्ती झाली. तथापि थोड्याच दिवसात दंगलग्रस्त गुजरातचे पोलिस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली. त्यानंतर रिबेरो यांचेकडे दहशतवादग्रस्त पंजाबचे पोलीस महासंचालक म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. तेथे सुवर्णमंदिर मुक्त करून शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या ताब्यात देण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्या कारवाईची देशभरातील वृत्तपत्रातून प्रशंसा झाली. मात्र त्यामुळे रिबेरो यांचेवर प्राणघातक हल्ला झाला होता व त्यांच्या पत्नीही गोळी लागून जखमी झाल्या होत्या. त्यानंतर पंजाबमध्येच त्यांना दोनदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र ६० वय पूर्ण झाल्यामुळे त्यांनी निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली. याच काळात त्यांना ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’ची पुनश्‍च सुवर्णमंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड करण्याची जबाबदारी देण्यात आली. तेव्हा अतिरेक्यांच्या शरणागतीचा कार्यक्रम जगभर थेट प्रक्षेपित करण्यात आला होता. निवृत्तीनंतर काही काळ रिबेरो यांचेकडे मिझोरामचे राज्यपालपद सोपविण्यात आले. त्यानंतर ४ वर्षांसाठी त्यांना रूमानिया येथे भारताचे राजदूत म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या देशातही १९९१ साली शीख अतिरेक्यांनी त्यांच्या हत्येचा एक प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना रूग्णालयात राहावे लागले होते. रूमानियाचे राजदूत म्हणून रिबेरो यांचेकडे अल्बानिया आणि मालोव्हॉ या देशांचीही जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर मात्र ते नवीन कामगिरी न स्वीकारता मुंबईत स्थायीक झाले. - सविता भावे

३३६ शिल्पकार चरित्रकोश