पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड यार्दी, मधुकर रामराव कार्यामध्ये स्वत:ला वाहून घेतले. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे ते विश्वस्त होते. त्यांच्या प्रेरणेने आणि पुढाकाराने पुण्यामध्ये ‘भारतीय विद्या भवन’ या संस्थेच्या केंद्राची स्थापना झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन उत्तम दर्जाच्या शाळा आणि अनेक अभ्यासक्रम सुरू झाले. १९७९ मध्ये ‘दि योगा ऑफ पातंजली’ हा त्यांचा पहिला ग्रंथ भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने प्रसिद्ध केला. महाभारत हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. महाभारताच्या अनुष्टुभ छंदाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन, या श्लोकांना संख्याशास्त्राचे निकष लावून प्रत्येक पर्वाचा चिकित्सक अभ्यास केला. यापूर्वी त्यांनी संख्याशास्त्रावर आधारित शेक्सपियरला अभ्यासून ‘क्रोनोलोजी ऑफ शेक्सपीयर्स प्लेज’ हा ग्रंथ तयार केला होता. त्याच पद्धतीने त्यांनी महाभारत अभ्यासून काही निष्कर्ष काढले. भगवद्गीता हा सुद्धा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय होता. ‘भगवद्गीता - ए सिंथेसिस’ हे त्या संशोधनाचे फलस्वरूप. त्यांची पत्नी अनुसूया हिच्यासह त्यांनी रामकृष्ण मिशन व शारदा मठाच्या कार्यात रस घेतला होता. - भारती कोतवाल

३२८ शिल्पकार चरित्रकोश