पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड बर्वे, सदाशिव गोविंद कालबद्ध नियोजन व खर्चासह तयार केला. हडपसर, चिंचवड, सातारा रस्ता येथे औद्योगिक वसाहती उभ्या केल्या. संभाजी उद्यान, पेशवे पार्क यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांनाच आहे. त्यांनी लक्ष्मी रस्ता व जंगली महाराज रस्ता हे दोन प्रमुख रस्ते तयार केले. लक्ष्मी रस्ता रुंद करण्यात एक गणपतीचे देऊळ आड येत होते. बर्वे यांनी धाडसाने निर्णय घेऊन, रातोरात मंदिर हलवले; रस्ता रुंद केला. पुढे त्या गणपती मूर्तीचीही यथोचित पुनर्स्थापना केली आणि पुण्याची नगररचनात्मक, आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणावर झाली. यामध्ये बर्वे यांचा निश्चितच मोठा वाटा आहे. १२जुलै१९६१ हा पुण्यासाठी काळा दिवस ठरला. पानशेत धरण फुटले. या वेळी बर्वे यांची उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. बर्वे यांनी ‘सरकारी अधिकार्‍यांच्या विश्रामगृहा’चे कार्यालयात व ‘वॉर रूम’मध्ये रूपांतर केले. या काळात त्यांनी रात्रंदिवस अथक परिश्रम केले. पाणीपुरवठा, शहराची पुन:उभारणी, आरोग्यसेवा, लोकांना तातडीची मदत, त्यांचे पुनर्वसन, दळणवळण, संपर्क साधने इत्यादी सर्वच आघाड्यांवर त्यांनी स्वत: उत्तम कार्य केले आणि वेगाने कामे करवूनही घेतली. पं.नेहरू व चिंतामणराव देशमुख यांनी बर्वे यांच्यावर दिल्लीजवळील फरीदाबादच्या उभारणीची जबाबदारी (१९५३) टाकली. एका वर्षात त्यांनी हे कार्य यशस्वीपणे पार पाडले. पुढे त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रालयात सहसचिव म्हणून काम केले. “आंतरराज्य विक्रीकर कायदा या क्लिष्ट कायद्याची उकल करताना बर्वे यांनी दर्शवलेले कौशल्य म्हणजे अर्थखात्याच्या कामाचे शिखर होते,” ही सी.डी. देशमुख यांची प्रतिक्रियाच सर्वकाही सांगून जाते. अनेक खाजगी विमा कंपन्यांचे एल.आय.सी.मध्ये रुपांतर व इंपिरीयल बँकेचे स्टेट बँकेमध्ये रुपांतर करण्यातही त्यांचे विशेष योगदान होते. बर्वे यांचे मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कानडी, उर्दू इत्यादी भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी भाषा मंडळावर चिटणीस म्हणून कार्य केले. मोठ्या द्वैभाषिक राज्याची विभागणी होत असताना विभाजन समितीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काम केले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होताना बर्वे यांनी उत्तम, निर्णायक कामगिरी बजावली. कोयना प्रकल्प निधीअभावी मागे पडत होता. या प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनामध्ये त्यांनी मुख्य भूमिका बजावली. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेचे दोन कोटी पन्नास लाख डॉलरचे कर्ज मंजूरीसाठी गेलेल्या शिष्ठमंडळाचे ते अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ते महाराष्ट्राच्या पहिल्या सिंचन आयोगाचे अध्यक्ष झाले. सिंचनविषयक संशोधनासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास केला आणि अभ्यासांती सहा पट (त्या वेळच्या प्रमाणाचा) जमीन सिंचनाखाली आणण्याचा अहवाल सादर केला. एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी दापोडी, सातारा, भोर येथे स्थानकांसाठी घेतलेल्या जागा, या स.गो.बर्वे यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक आहे. महाराष्ट्र उद्योग खात्याचे सचिव असताना मुंबईवरचा अतिरिक्त बोजा कमी शिल्पकार चरित्रकोश २९५